राष्ट्रवादी काँग्रेस आणि कॉंग्रेसने मुस्लीम समाजातील मागासलेल्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिकरित्या शैक्षणिक आरक्षण पाच टक्के देण्याची तरतूद केली होती. आता शिंदे-फडणवीस सरकारने मुस्लीम आरक्षणावर त्यांची काय भूमिका आहे, हे स्पष्ट करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे.
राज्यातील ५६ मुस्लीमबहुल शहरातील मुस्लीम समाजाच्या शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक मागासलेपणाचे सर्वेक्षण ‘टीस’ या संस्थेच्या माध्यमातून राज्यसरकार करणार आहे. मुळात देशपातळीवर मुस्लीम समाजाबद्दल भाजपची काय भूमिका आहे, हे वेगळे सांगायला नको, असा टोलाही महेश तपासे यांनी लगावला आहे.
हेही वाचा – शिवसेनेच्या ‘जनआक्रोश मोर्चा’वर रोहित पवारांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले, “आदित्य ठाकरे वेदान्ताबाबत केवळ…”
सबका साथ, सबका विकास हा मंत्र मोदींनी दिला. मात्र, २०१४ नंतर भाजप राजवटीत मुस्लीम समाजाबाबत काय काय घडलं, हे सांगण्याची आवश्यकता नाही. आता राज्यसरकार हे सर्वेक्षण करत आहे. मात्र, राज्यसरकारचा हेतू शुद्ध असेल, तर त्यांचे स्वागत आहे, असेही महेश तपासे म्हणाले.