आता तुम्हाला शेतकऱ्यांचा हिसका दाखवतोच, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे करमाळ्यातील अधिकृत उमेदवार संजय पाटील घाटणेकर यांनी अजित पवार यांना दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने करमाळा मतदारसंघातून संजय पाटील घाटणेकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. परंतु अजित पवार यांनी करमाळ्यात झालेल्या सभेत घाटणेकर यांना डावलून अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदे यांना पाठिंबा देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर घाटणेकर यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.
“सातत्यानं आम्ही शेतकरी चळवळीत सहभागी होत असतो. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसने आम्हाला उमेदवारी दिली आहे. पण अजित पवार यांनी भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यांचं ते वक्तव्य हे विधान दुर्देवी आहे. त्याचा आमच्यावर कोणत्याही प्रकारचा परिणाम होणार नाही,” असं घाटणेकर यांनी स्पष्ट केलं.
“आम्ही शेतकरी चळवळीतली माणसं आहोत. अजित पवार यांनी आम्हाला पाठिंबा दिला किंवा नाही दिला त्याचा आम्हाला फरक पडणार नाही. शेतकऱ्यांना सोबत घेऊन करमाळा मतदारसंघात आम्ही ही लढाई लढू आणि जिंकून दाखवू,” असंही त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने करमाळा विधानसभा मतदारसंघात संजय कृष्णराव पाटील (घाटणेकर) यांना उमेदवारी दिली होती. मात्र त्यानंतर त्यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आदेश पक्षाच्यावतीने देण्यात आले मात्र तांत्रिक अडचणीमुळे अर्ज मागे घेता आला नाही. तो अर्ज तसाच आहे. त्यामुळे अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने जाहीर पाठिंबा देण्याचे निश्चित करण्यात आले असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसकडून सांगण्यात आलं आहे.