मी महाराष्ट्राला विनंती करतो की कृपया सनातन धर्म आणि हिंदू धर्म यामध्ये गल्लत करू नका. हिंदू धर्म हा सुधारणावादी धर्म आहे. तर सनातन धर्म हा मनुवादी आणि रूढी परंपरांना मानणारा धर्म आहे. सनानत म्हणजेच रूढी आणि परंपरा हे लक्षात घ्या असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा एकदा सनातन धर्मावर भाष्य केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांना शूद्र आहात हे सांगणाऱ्या आम्ही विरोध करणारच असंही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. विधानसभेच्या बाहेर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी काय म्हटलं आहे?

बुद्धांना ज्यांनी सतावलं तो सनातन धर्म. हिंदू धर्मातून बाहेर जाऊन महावीरांनी २४ तीर्थकरांसह जैन धर्म स्थापन केला तो सनातन धर्माला कंटाळून. बसवेश्वरांनी लिंगायत समाज स्थापन केला तो सनातन धर्माला कंटाळून. चक्रधर स्वामींनी लीळामृत लिहिलं आणि महानुभव पंथ स्थापन केला तो सनातन्यांना कंटाळून. ज्ञानेश्वर माऊलींच्या आई वडिलांना आत्महत्या करावी लागली ती या सनातन्यांमुळे. सावता माळी, गोरा कुंभार, चोखा मेळा यांच्यासह सगळी संत परंपरा विद्रोहात उतरली कारण होतं मनुवादी सनातनी. तुकाराम महाराजांना सनातन्यांनी सर्वाधिक त्रास दिला. त्यांचं जे काही झालं ते या मनुवाद्यांमुळेच. छत्रपती शिवाजी महाराजांना तोंडावर तुम्ही क्षुद्र आहात तुमचा राज्याभिषेक करणार नाही हे सनातनी मनुवाद्यांनी सांगितलं. संभाजी महाराजांच्या हत्येमध्ये ज्यांचा सहभाग होता ज्यांनी औरंगजेबाला माहिती दिली ते सनातन मनुवादी होते.

महात्मा फुलेंनी स्त्री शिक्षणाचा मार्ग मोकळा केला. कारण सनातन धर्माने स्त्रियांवर इतकी बंधनं लादली होती की त्यांना घराच्या बाहेरच पडता येत नव्हतं. ब्राह्मण स्त्री विधवा झाली तर तिचे केस उपटून तिचं मुंडण केलं जायचं. एखाद्या महिलेची मासिक पाळी आली तर तिला चार दिवस घराच्या बाहेर बसवायचे हा होता सनातन धर्म.

सनातन धर्माला महात्मा फुलेंनी विरोध केला. शाहू महाराजांनी या सनातन धर्माला विरोध केला. एकदा शाहू महाराज आचमन करत होते तेव्हा त्यांच्यासोबत रामशास्त्री भागवत नावाचे त्यांचे मित्र होते. त्यांनी सांगितलं तुम्ही जे मंत्र म्हणता ते तुम्हाला लागू होत नाहीत कारण तुम्ही शुद्र आहात. शिवाजी महाराज, संभाजी महाराज, शाहू महाराज यांना शुद्र म्हणवणारे सनातनी यांचा अखेरचा अंत हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केला. बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली, चवदार तळ्याचा सत्याग्रह केला.

सनातन धर्माने समाजात भेदभाव निर्माण केला

सनातन धर्माने समाजात भेदभाव निर्माण केला. वेगवेगळ्या जातींना वेगवेगळ्या कारणांसाठी समाजाच्या बाहेर ढकललं. कुठल्याच जातीला माणसाप्रमाणे वागू दिलं नाही अशा सनातन्यांना आमचा विरोध आहे. हिंदू धर्म आणि सनातन धर्म हे दोन वेगवेगळे प्रकार आहेत. वसुधैव कुटुंबकम म्हणणारा हा आमचा हिंदू धर्म आहे आणि दुसऱ्याला नीच दाखवणारा त्याला कमी लेखणारा हा सनातन धर्म आहे. आम्ही आजही सनातन धर्माच्या विरोधात आहोत. या मनुवादी सनातन्यांना विरोध करणं हे आम्ही आमचं कर्तव्य मानतो. हिंदू समाज हा कायमच सनातन धर्माच्या विरोधात उभा राहिला आहे जे मोर्चे काढत आहेत त्यांना सनातन धर्म म्हणजे काय आणि हिंदू धर्म म्हणजे काय याचा अर्थच समजत नाही असंही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.