राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांच्यावर घणाघाती टीका करत माजी आमदार रमेश कदम यांनी आज पक्ष सदस्यत्वाच्या राजीनाम्यावर ठाम असल्याची भूमिका जाहीर केली. याप्रसंगी त्यांनी प्रदेशाध्यक्ष जाधव यांच्यावर केलेली कठोर टीका लक्षात घेता त्यांचा राजीनामा मंजूर करण्याशिवाय पक्षनेतृत्वाला पर्याय उरलेला नाही.
सुमारे दीड महिन्यापूर्वी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतरही कदम यांचे पक्षाच्या राज्य व स्थानिक पातळीवरील नेत्यांबरोबर बैठका-चर्चा चालू होत्या. त्यामुळे या प्रश्नी काहीतरी तोडगा निघेल, अशी अनेकांना आशा होती. त्याबाबत भूमिका जाहीर करण्यासाठी कदम यांनी आज चिपळूणमध्ये समर्थकांचा मेळावा आयोजित केला. या प्रसंगी बोलताना ते म्हणाले की, मी पक्षस्थापनेपासून रात्रंदिवस काम करून पक्ष वाढवला. अनेक संकटांचा सामना केला. पण पक्षाच्या माजी पालकमंत्र्याला पत राखता आली नाही. त्यांनी भयंकर त्रास दिला. एकवेळ अरुण गवळीच्या हाताखाली काम करणे परवडेल, पण यांच्या हाताखाली काम करणे शक्य नाही. त्यामुळे मी पक्ष सदस्यत्व राजीनाम्यावर ठाम आहे.
प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांचा नामोल्लेख न करता कदम पुढे म्हणाले की, नगर परिषदेच्या निवडणुकीत प्रदेशाध्यक्षांनी स्वतंत्र पॅनेल उभे केले. कारण शहरातील मोक्याच्या जागा हडप करण्यासाठी त्यांना नगर परिषदेत सत्ता हवी होती. जागेचे व्यवहार, वाळूचा व्यवसाय इत्यादीसाठी त्यांनी गुंड पोसले आहेत. त्यांचा उन्माद, मस्ती जिरवल्याशिवाय, त्यांना नेस्तनाबूत केल्याशिवाय पक्षातील नेत्यांच्या खांद्याला खांदा लावणार नाही. २०१४ च्या निवडणुकीत हे पार्सल गुहागरातून तुरंबवला (जाधवांचे मूळ गाव) परत पाठवण्याचा निर्धारही कदम यांनी व्यक्त केला.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष शेखर निकम हेही या मेळाव्याला उपस्थित होते. मात्र आपण पक्षाचे पदाधिकारी म्हणून नव्हे, तर कदम यांचे स्नेही म्हणून उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी पूर्वीच जाहीर केले होते. त्यानुसार मेळाव्यात बोलताना, कदम यांना पक्षातच राहण्याची विनंती त्यांनी केली. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचाही तसा निरोप असल्याचे सांगितले. तसेच संपूर्ण जिल्हा त्यांच्या पाठीशी राहील, असे आश्वासन दिले. पण या वक्तव्यामुळे विचलित न होता कदम आपल्या निर्णयावर ठाम राहिले. या पूर्वी त्यांनी राजीनामा दिला असतानाही पक्षाचे मंत्री सुनील तटकरे, सध्याचे पालकमंत्री उदय सामंत, जिल्हाध्यक्ष निकम इत्यादी नेतेमंडळी त्यांच्या नियमितपणे भेटीगाठी घेत होते. पण आजच्या मेळाव्यात प्रदेशाध्यक्षांबद्दल त्यांनी वापरलेली भाषा आणि व्यक्त केलेला निर्धार लक्षात घेता यापुढे कोणाही पक्ष कार्यकर्त्यांला किंवा नेत्याला त्यांच्याशी उघडपणे संपर्क ठेवणे अवघड होऊन बसले आहे. तसेच त्यांच्या आजच्या भाषणाचा आधार घेऊन प्रदेशाध्यक्ष जाधव त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यासाठी पक्षश्रेष्ठींवर दबाव आणतील, हे उघड आहे.
कदम यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे जिल्’ाातील राष्ट्रवादी कॉंग्रेससह एकूणच राजकीय वातावरण आगामी काही महिन्यात ढवळून निघणार आहे. कदम यांची कोणत्याही मतदारसंघातून निवडून येण्याइतकी ताकद नसली तरी आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकीत पक्षाचे नुकसान करण्याइतके उपद्रवमूल्य त्यांच्याकडे आहे. त्याचा परिणाम या निवडणुकांच्या निकालावर होऊ शकतो.