जिल्हा परिषद निवडणुकीत पक्षविरोधी कारवाया केल्याप्रकरणी माजी मंत्री सुरेश धस यांची शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली. नुकत्याच पार पडलेल्या बीड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सुरेश धस यांनी भाजपशी घरोबा केल्यामुळे भाजपला सत्तेपासून दूर राहावे लागले होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी धस यांच्यावर कारवाई करण्याची मागणी लावून धरली होती. राष्ट्रवादीचे माजी आमदार प्रकाश सोळंके यांनी तर पक्षाविरोधात बंडाळी करणाऱ्या धस यांच्यावर कारवाई झाली नाही तर पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे अखेर आज सुरेश धस यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसकडून जाहीर करण्यात आले.

बीड जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वाधिक २५ जागा जिंकूनही सुरेश धस यांच्या बंडाळीमुळे सत्तेपासून राष्ट्रवादीला दूर रहावे लागले होते. माजलगाव विधानसभा मतदार संघातून प्रकाश सोळंके यांनी ९ जिल्हा परिषद सदस्य निवडून आणले होते. त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी सोळंके यांच्या पत्नीच्या नावाची दावेदारी होती. मात्र शेवटच्या क्षणाला सुरेश धस हे पंकजा मुंडेंच्या गोटात दाखल झाल्यामुळे सोळंके यांना अध्यक्षपदावर पाणी सोडावे लागले होते. त्यामुळे नाराज झालेल्या सोळंके यांनी धस यांच्यावर कारवाई झाली नाही तर पक्ष सोडण्याचा पवित्रा सोळंके यांनी घेतला होता.

तर सुरेश धस यांनी स्वत:ची बाजू मांडताना स्थानिक नेत्यांवर दोषारोप केले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांविषयीची नाराजी नाही. मात्र, स्थानिक नेते केवळ समर्थकांना मोठे करण्यासाठी धडपडताहेत. ज्या गटातून पत्नी निवडणुकीत उभी होती, तेथे राष्ट्रवादीच्या जिल्ह्य़ातील नेत्यांनी विरोधी उमेदवारांना पैसे पुरवले. आता कारवाईची भाषा केली जात आहे. मी कारवाईस तयार आहे, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री सुरेश धस यांनी व्यक्त केली होती. बीड जिल्हा परिषदेत भाजप सत्तेत यावी म्हणून धस यांच्या समर्थकांनी मतदान केल्यामुळे ते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू होती. ‘अद्याप मी राष्ट्रवादीत आहे. आता त्यांनी कारवाई करायची ठरवली आहे. पण तत्पूर्वी म्हणणे ऐकून घ्या,’ अशी विनंती राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना करणार असल्याचे धस यांनी सांगितले होते.