कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार  यांनी निवडणुकांच्या पार्श्वभूमी कामाचा धडाका सुरू केला आहे. कर्जत आणि जामखेड या दोन्ही तालुक्यांत मिळून सुमारे २३० कोटी रुपयांची विविध विकास कामे होणार आहेत. या कामांचे भूमिपूजन शनिवारी पार पडले आहे. कर्जत-जामखेडमधील विविध विकास कामांचा अजित पवार, अशोक चव्हाण, एकनाथ शिंदे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार आणि दत्तामामा भरणे यांच्या हस्ते शुभारंभ झाला. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.

“काही लोकांनी निवडणुका समोर ठेवून काही तरी थातुरमातुर सांगण्याचा प्रयत्न केला. जामखेडमध्ये पिण्याच्या पाण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होती. पिण्याचे पाणी जास्त दाबाने मिळावे यासाठी एकनाथ शिंदे आणि मी प्रयत्न केला. रोहित पवार यांनी पाठपुरावा केली आणि आता आपण ही योजना मार्गी लावली आहे. मागे लोकसभेच्या निवडणुका तोंडावर असताना त्यावेळचे मुख्यमंत्री इथे आले होते. त्यांनी एक कागद दाखवला आणि सांगितले तत्वतः तुमची योजना मंजूर केली आहे. तत्वतः म्हणजे काय? एकदा योजना मंजुर तरी करायला हवी किंवा मंजुर करणार आहोत असे सांगितले पाहिजे. मी पण अनेक वर्षे काम करत आहे. पण तत्वतः म्हणजे काय? काहीतरी लोकांची दिशाभूल करुन वेळ मारून न्यायचे काम केले,” असे अजित पवार यांनी म्हटले.

यावेळी अजित पवार यांनी कर्जत जामखेडचे माजी आमदार राम शिंदे यांच्यावरही निशाणा साधला. “ज्यांनी जे काम केले आहे त्यांना त्याचे श्रेय दिले पाहिजे. आम्ही आमदारांचा निधी चार कोटी केला. मात्र केंद्राने खासदारांचा निधी बंद केला होता. आधीच्या आमदारांच्या कामाचा दर्जा चांगला नव्हता. त्यामुळे केलेले काम अडचणीत येत होते. आज रोहित पवार प्रयत्न करत आहे,” असे अजित पवार म्हणाले.

“या कामांसाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून निधी देण्याचे काम आपण करत आहोत. यामध्ये मागच्या आमदारांनी सांगितले हे माझ्या काळात झाले आहे तर यात काही तथ्य नाही. कामे त्या त्या वेळेत करावी लागतात. निधी द्यावा लागतो. तुम्ही १० वर्षे आमदार असताना केलेली कामे दिसत आहेत. पण आता रोहित पवार जी कामे करत आहे त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न चालला आहे. आता जरा गपगुमान बसा. आता लोकांनी थांबवलेले आहे ते मान्य करावे. आपले कुठे चुकले आणि कुठे आपण कमी पडलो त्याचे आत्मपरिक्षण करा. त्यातून बोध घ्या,” असे अजित पवार म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.