मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातही याचे पडसाद उमटू लागले असून ठाकेर गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी तो ट्वीट करत सरकारवर टीका केली आहे. या व्हिडीओवर राजकीय प्रतिक्रया येत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी त्या व्हिडीओवरून राज्य सरकारला लक्ष्य केलं आहे.
काय आहे या व्हिडीओमध्ये?
हा व्हिडीओ या तिघांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेच्या आधीचा असल्याचं दिसत आहे. मराठा आरक्षणासंदर्भात राज्यस्तरीय बैठक झाल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेपूर्वीचा हा व्हिडीओ असल्याचं सांगितलं जात आहे. या व्हिडीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेच्या ठिकाणी येताच “आपण बोलून मोकळं व्हायचं, निघून जायचं”, असं म्हटल्याचं माईकमध्ये रेकॉर्ड झालं. त्यावर देवेंद्र फडणवीसांनी त्यांना माईक चालू असल्याची आठवण करून दिली. पुढे अजित पवारही त्यावर “येस, येस” म्हणताना दिसत आहेत.
विरोधकांची टीका
दरम्यान, या व्हिडीओवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांचं हे विधान म्हणजे त्यांची मराठा आरक्षण प्रश्नाबाबतची अनास्थाच दर्शवत असल्याचं ओमराजे निंबाळकर यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना यावर परखड प्रतिक्रिया दिली आहे.
“हा विषय फक्त मराठा आरक्षणाच्या बाबतीतला नाही. त्या व्हिडीओचा आम्ही निषेध करतो. समाजाच्या हक्कासाठी कुणीतरी उपोषणाला बसलं आहे. त्या व्यक्तीची प्रकृती खालावली आहे. अशा स्थितीत तुम्ही जर फक्त म्हणत असाल की ‘बोलून मोकळं व्हायचं’, याचा अर्थ तुम्ही त्यात राजकारण करत आहात. या सामान्य लोकांच्या प्रश्नावर तुम्ही राजकारण करत असाल तर लोकांना सगळ्या गोष्टी कळत आहेत”, असं रोहित पवार म्हणाले.
देवेंद्र फडणवीसांना ‘त्या’ विधानाची करून दिली आठवण
दरम्यान, यावेळी रोहित पवारांनी देवेंद्र फडणवीसांना त्यांच्या एका विधानाची आठवण करून दिली आहे. “तलाठी भरती किंवा इतर कोणत्या भरतीवेळी जेव्हा सामान्य लोकांच्या मुलांकडून हजारो रुपयांची वसुली केली जाते, तेव्हा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगतात की ‘आजची पीढी गंभीर नाही, म्हणून आम्ही त्यांच्याकडून पैसे गोळा करतो’. पण तुम्ही पत्रकार परिषदेत आरक्षणाचा विषय हाताळत असताना गंभीर नसता, तुम्ही युवकांच्या बाबतीतला प्रश्न हाताळताना गंभीर नसता, कपाशीचा प्रश्न सोडवताना तु्म्ही गंभीर नसता. पण हो, पदं कुठली मिळवायची, मुख्यमंत्रीपद व उपमुख्यमंत्रीपद, इतर संघटना यांची पदं आपल्या कार्यकर्त्यांना कशी मिळवून देता येतील, यासाठीच फक्त हे गंभीर आहेत. पण सामान्य लोकांच्या बाबतीत सरकारकडे गांभीर्य दिसत नाही”, असंही रोहित पवार म्हणाले.