विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी २०१९मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यासह घेतलेला शपथविधी आजतागायत चर्चेत राहिला आहे. अजित पवार त्यांच्या अशा सडेतोड वृत्तीमुळे चर्चेचा विषय ठरतात. मात्र, आत्तापर्यंत चार वेळा उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळलेल्या अजित पवारांना मुख्यमंत्रीपदाची संधी अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्येही नाराजी असल्याचं चित्र अनेकदा पाहायला मिळतं. मात्र, खुद्द अजित पवारांनी आता मुख्यमंत्रीपदाबाबत भाष्य केलं आहे.
अजित पवार मुख्यमंत्री?
करोना काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मातोश्रीवरून राज्यकारभारावर लक्ष ठेवून असताना उपमुख्यमंत्री अजित पवार हे मात्र मंत्रालयात जाऊन प्रत्यक्ष अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेऊन कामकाज पाहाताना दिसत होते. त्यामुळे अजित पवारच मुख्यमंत्र्यांप्रमाणे काम करत असल्याची खोचक टीकाही तत्कालीन विरोधकांकडून केली जात होती. या पार्श्वभूमीवर अजित पवारांनाही मुख्यमंत्रीपदाची इच्छा आहे का? अशी चर्चा रंगताना अनेकदा पाहायला मिळते. यासंदर्भात एका मुलाखतीमध्ये बोलताना अजित पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
“आपण कितीही काहीही म्हटलं, तरी शेवटी प्रयत्न करणं हेच प्रत्येकाच्या हातात असतं. कुठेतरी नशीबाचीही साथ लागते. सगळ्याच क्षेत्रात. कितीही प्रयत्न केले, तरी त्यांना नशिबाचीही साथ असायला हवी. देशात पंतप्रधानांच्या योग्यतेची अनेक माणसं आहेत किंवा होती. पण सगळ्यांना ते पद मिळतं का? नाही मिळत”, असं अजित पवारांनी नमूद केलं.
आणखी वाचा – राजकीय जीवनात कोणत्या चुका केल्या? अजित पवार म्हणतात, “एक मोठी चूक वाटते की २००४ मध्ये…!”
“काम करत राहायचं”
“एखाद्यानं एखादं क्षेत्र निवडल्यानंतर त्यात सतत काम करत राहाणं आणि कुणाच्याही बद्दल मनात आकस न ठेवता पुढे जाणं, कागाळ्या न करणं, कुणी आपल्याबद्दल वाकडं बोललं असेल तरी ते दुर्लक्षित करत पुढे जाणं अशा गोष्टी करत राहायचं. राज्याचं चार वेळा उपमुख्यमंत्रीपद मिळणं हेही पक्षामुळे, कार्यकर्त्यांमुळेच शक्य झालं आहे”, असंही अजित पवार यावेळी म्हणाले.
आणखी वाचा – “सत्यजीतसाठी शरद पवारांनी खरगे यांना फोन केला होता, पण…”, अजित पवारांचा मोठा खुलासा
“आत्याबाईला मिशा…”
दरम्यान, यावेळी मुख्यमंत्री झाल्यानंतर काय कराल? असा प्रश्न अजित पवारांना विचारताच त्यांनी मिश्किल शैलीत उत्तर दिलं. “आत्याबाईला मिशा असत्या तर काय झालं असतं तसं सांगण्यासारखं आहे. मुख्यमंत्री झाल्यावर दाखवतो काय करायचंय ते”, असं अजित पवार यावेळी म्हणाले.