राज्यात पुन्हा एकदा करोनानं डोकं वर काढलं असताना राजकीय नेत्यांच्या कुटुंबीयांच्या लग्नामध्ये होणारी गर्दी चिंतेचा विषय ठरत आहे. दरम्यान लग्नांमध्ये उपस्थिती लावणाऱ्या अनेक नेत्यांना करोनाची लागण झाली असल्याचं समोर आलं आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांचाही समावेश आहे. सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत आपल्याला आणि पतीला करोनाची लागण झाल्याची माहिती दिली.
दरम्यान यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी ट्वीट केलं असून सुप्रिया सुळेंना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
सुप्रिया सुळे यांनी ट्वीटमध्ये काय म्हटलं –
“मी आणि सदानंद, आम्हा दोघांचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. काळजी करण्याचे कारण नाही पण आमच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करुन घ्यावी,ही नम्र विनंती. काळजी घ्या,” असं ट्वीट सुप्रिया सुळेंनी केलं होतं.
यावर पार्थ पवार यांनी “आत्या काळजी घ्या, तुम्ही दोघे लवकर बरे व्हाल” असं म्हटलं आहे.
दरम्यान सुप्रिया सुळेंसोबतच राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड. भाजपाचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील यांनाही करोनाची लागण झाली आहे. यामधील वर्षा गायकवाड हिवाळी अधिवेशनात उपस्थित होत्या. तर दुसरीकडे हर्षवर्धन पाटील यांच्या मुलीचं दोन दिवसांपूर्वीच थाटामाटात लग्न पार पडलं होतं. या लग्नाला सुप्रिया सुळेही हजर होत्या. तसंच जयंत पाटलांच्या मुलाच्या लग्नालाही त्यांनी हजेरी लावली होती.
दरम्यान विखे पाटील यांनी भाजपाचे माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या मुलाच्या लग्न सोहळ्याला उपस्थिती लावली होती. या लग्न सोहळ्याला विरोधी पक्ष नेते फडणवीस यांच्यासह अनेक भाजपाच्या नेत्यांनी हजेरी लावली होती. विशेष म्हणजे या सोहळ्याला मोठी गर्दी होत करोनाबाबत असलेल्या नियमांचे पालन न झाल्याची चर्चा रंगली होती.