मराठा आरक्षणाला सत्यशोधक ओबीसी परिषदेचा विरोध नाही. तथापि, राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही घटक ओबीसी नेत्यांना जवळ करतात आणि दुसरीकडे याच पक्षातील काही जण मराठा आरक्षणासाठी संघर्ष करतात. राष्ट्रवादीची ही खेळी म्हणजे केवळ निवडणूक डोळ्यासमोर ठेवून दोन्ही समाजाची मते मिळविण्याचा प्रयत्न असल्याची टीका परिषदेचे राज्य अध्यक्ष हनुमंत उपरे यांनी केली. सत्यशोधक ओबीसी परिषदेच्या वतीने रविवारी येथे पाचव्या ओबीसी महापरिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पत्रकारांशी ते बोलत होते. ओबीसींमधील काही समाज संघटनांनी सुरू केलेल्या धर्मातर चळवळीकडे दुर्लक्ष करणारे राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या बालेकिल्ल्यात या परिषदेच्या माध्यमातून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. या परिषदेत सात ठराव मंजूर करण्यात आले.
दादासाहेब गायकवाड सभागृहात झालेल्या या परिषदेचे उद्घाटन मानवी हक्क कार्यकर्ते अ‍ॅड. आर. आर. बाग यांच्या हस्ते झाले. सत्यशोधक ओबीसी परिषदेने ‘आता ओबीसी बांधव बुद्ध धम्माच्या वाटेवर’ हे अभियान हाती घेतले असून याअंतर्गत धर्मातराच्या विषयावर जनजागृतीसाठी राज्यात ठिकठिकाणी परिषदांचे आयोजन केले जात असून नाशिक येथे होणारी ही परिषद त्याचाच एक भाग होती. २०१६ पर्यंत लाखो ओबीसी बांधव बुद्ध धर्म स्वीकारतील, असा विश्वास उपरे यांनी व्यक्त केला. अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचे हे अभियान आहे. बहुजन समाजावर उच्चवर्णीयांकडून अत्याचार केले जात आहेत. या मानसिक गुलामगिरीतून बाहेर पडण्यासाठी ओबीसींनी संघटित आणि शिक्षित होणे आवश्यक असल्याचे उपरे यांनी नमूद केले. उद्घाटक बाग यांनी बुद्ध धर्मात अशिक्षितांचे प्रमाण अधिक असल्याचे सांगत सर्वानी शिक्षणाची कास धरण्याचे आवाहन केले.
परिषदेत वेगवेगळ्या विषयांवरील सात ठराव मंजूर करण्यात आले. त्यात बोधगया येथील बुद्धविहार हे बौद्ध धर्मीयांच्या ताब्यात देण्यात यावे, पुणे विद्यापीठाला माता सावित्रीबाई फुले यांचे नाव देणे व मुंबई विद्यापीठाला संत तुकाराम महाराजांचे नाव द्यावे, कुंभमेळ्याला देण्यात येणारा निधी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना पुनर्वसनासाठी देण्यात यावा, पांडवलेणीचा भविष्यात त्रिरश्मी लेणी असा नामोल्लेख करणे, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे मूल्यशिक्षण अभ्यासक्रमाच्या निर्मितीत आध्यात्मिक क्षेत्रातील बुवा व बाबांना आमंत्रित करण्याच्या कृतीचा निषेध, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्व विद्यापीठाच्या सहकार्याने सुरू केलेला मूल्य शिक्षणाचा अभ्यासक्रम त्वरित बंद करावा आणि वैज्ञानिक व पुरोगामी विचारधारेच्या मूल्यांचा अभ्यासक्रमात समावेश करावा आदी ठरावांचा समावेश आहे.