गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी ‘रिडालोस’मधून बाहेर पडून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला पाठिंबा देणाऱ्या रिपाइंला (गवई गट) अमरावतीच्या जागेवरून राष्ट्रवादी काँग्रेसने अजूनही टांगणीवरच ठेवले असल्याने रिपाइंच्या कार्यकर्त्यांची अस्वस्थता वाढली आहे.
अमरावतीतून निवडणूक लढण्यासाठी राष्ट्रवादीने ‘घडय़ाळ’ या पक्षचिन्हाची अट लादल्याचे आणि आपण ते नाकारल्याचे डॉ. राजेंद्र गवई यांचे म्हणणे आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादीने अजूनपर्यंत उमेदवार ठरवलेला नसला तरी डॉ. गवई यांच्याखेरीज अन्य तीन उमेदवार राष्ट्रवादीच्या प्रतीक्षा यादीवर आहेत.
अमरावतीतून निवडणूक लढवण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीने विनाअट पाठिंबा द्यावा, अशी डॉॅ. गवई यांची अपेक्षा आहे. अमरावतीची जागा न मिळाल्यास राज्यात २० जागांवर उमेदवार उभे करू, असा इशारा डॉ. राजेंद्र गवई यांनी दिला आहे. आम्ही चिल्लर असलो तरी आमच्याशिवाय त्यांचा (काँग्रेस-राष्ट्रवादी) बंदा रुपया होऊ शकत नाही, असेही त्यांचे म्हणणे आहे. रिपब्लिकन पक्षाच्या गवई गटाला गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादीच्या ‘कोटय़ा’तून अमरावतीची जागा मिळाली होती, पण डॉ. राजेंद्र गवई यांना पराभव पत्करावा लागला होता.  राष्ट्रवादीला गवई गट चालतो. मात्र, गवई यांची रिपाइं चळवळ का चालत नाही, असा सवाल डॉ. राजेंद्र गवई यांनी केला आहे.