दसरा मेळाव्यासाठी दादरचे शिवाजी पार्क मैदान मिळविण्याकरिता शिवसेना आणि बंडखोर आमदारांच्या गटामध्ये रस्सीखेच सुरू असून मुंबई महापालिकेने कोणाला परवानगी द्यायची याबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही. दुसरीकडे, वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदान मिळावे याकरिता बंडखोर आमदारांच्या गटाने केलेला अर्ज ‘एमएमआरडीए’ने स्वीकारला आहे. त्यामुळे शिवसेनेला दसरा मेळाव्यासाठी मैदान मिळणार की नाही याचं उत्तर अद्याप गुलदस्त्यात आहे. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोलापुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना यावर भाष्य केलं आहे.

२०२४ च्या निवडणुकीत मोदींविरोधात कोणता चेहरा? शरद पवारांचं मोठं विधान, म्हणाले “काँग्रेसला सोबत घेऊ नये…”

शिवाजी पार्क म्हणजे शिवसेना हेच समीकरण असल्याचं सांगत शरद पवारांनी शिवसेनेची पाठराखण केली आहे. “बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना आज उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात कार्यरत आहे. दसरा मेळावा घेण्याची त्यांची परंपरा आहे, ती लक्षात घेता त्यांनी केलेली मागणी गैर नाही,” असं शरद पवार म्हणाले आहे.

वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदान शिंदे गटाला; दसरा मेळाव्यासाठी बंडखोरांचा अर्ज स्वीकारला, शिवसेनेचा फेटाळला

पुढे बोलताना त्यांनी सांगितलं “एकनाथ शिंदेंना दसरा मेळावा घेण्याचा अधिकार आहे, तेदेखील घेऊ शकतात. त्याच्यासाठी त्यांनी बीकेसीचं मैदान मागितलं आणि त्यांना ते मिळालं आहे. त्यामुळे दुसऱ्यांना विरोध करण्याचं काही कारण नाही. शिवसेनेलाही परवानगी देणं आवश्यक आहे”.

२०२४ च्या निवडणुकीत मोदींविरोधात कोणता चेहरा? 

२०२४ मध्ये विरोधी पक्ष एकत्रित लढेल का? असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले “एकत्रित काहीतरी करावं अशी सर्वांची इच्छा आहे. मात्र अद्याप यासंबंधी काही नियोजन करण्यात आलेलं नाही. नितीशकुमार, ममता बॅनर्जी यांनी माझी भेट घेत मतं मांडली आहेत. मात्र अद्याप त्यांचं निर्णयात रुपांतर झालेलं नाही”. काँग्रेस यामध्ये अडसर ठरत नसल्याचंही शरद पवारांनी यावेळी स्पष्ट केलं.

“काँग्रेसला सोबत घेऊ नये असं काहींचं म्हणणं आहे. पण मला वाटतं, कोणी कोणाला सोबत घेऊ नये ही भूमिका घेऊ नये,” असं शरद पवारांनी स्पष्ट केलं.

नाना पटोले यांनी काँग्रेस स्वबळावर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लढणार असल्याचं जाही केल्यासंबंधी विचारलं असता, आमच्या शुभेच्छा आहेत असं शरद पवार म्हणाले. रामदास कदम यांनी उद्दव ठाकरे सोनिया गांधी, शरद पवार यांच्या नादी लागून बिघडले अशी टीका केल्यासंबंधी विचारलं असता, ‘कोण बोलतंय, कोण आरोप करतंय याची नोंद घेतली पाहिजे’ असा टोला लगावला.

“कारण नसताना संजय राऊत यांना तुरुंगात टाकलं आहे आणि आम्ही वाऱ्यावर सोडलं असं बोलत आहेत. हा सत्तेचा गैरवापर आहे. अनिल देशमुख, नवाब मलिक, संजय राऊत यांना विनाकारण जेलमध्ये टाकलं आहे,” असा आरोप शरद पवारांनी केला.