राज्यात भारनियमानाचं संकट ओढावलं आहे. दिवाळी तोंडावर आलेली असताना चंद्रपूर, खापरखेडा, परळी भुसावळ येथील औष्णिक वीज निर्मिती केंद्रात कोळशाचा तुटवडा आहे. राज्यात प्रचंड उकाडय़ामुळे विजेची मागणी मागच्या वर्षीच्या तुलनेत दोन हजार मेगावॉटने वाढल्याने आणि त्याच वेळी वीजप्रकल्पांना कोळसा टंचाई भेडसावत असल्याने राज्यात रहिवासी भागात दोन ते ८ तास तर कृषीपंपांना दोन तास वीजकपात सुरू झाली आहे. या सगळ्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने कंदील आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्राचा नकाशा अंधारात दाखवत अंध:कारात नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा असे ट्विट राष्ट्रवादी काँग्रेसने केले आहे.

१२ ऑक्टोबरला राष्ट्रवादी काँग्रेसने कंदील आंदोलनाची हाक दिली आहे. महाराष्ट्र सरकारने राज्याला अंधारात ढकलले अशी टीका राष्ट्रवादीने केली आहे. याआधी जितेंद्र आव्हाड यांनीही मुंब्रा येथील भारनियमानविरोधात आवाज उठवत अधिकारी फोन उचलत नसल्याची टीका केली आहे. तसेच प्रसंगी जाळपोळ तोडफोड झाली तर आम्ही जबाबदार नाही असेही म्हटले आहे. अशात राष्ट्रवादीने आंदोलनाची हाक दिली आहे. तसेच MSEB कार्यालयांसमोर राष्ट्रवादीच्या युवक संघटनेतर्फे आंदोलन केले जाणार आहे असेही स्पष्ट करण्यात आले आहे.