Maharashtra Politics, Thackeray vs Shinde Group: विधान परिषदेच्या उपसभापती आणि ठाकरे गटाच्या महिला नेत्या नीलम गोऱ्हे यांनी आज शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे हा ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून नीलम गोऱ्हे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यावर आज अखेर पडदा पडला असून नीलम गोऱ्हेंनी ठाकरे गटाला रामराम ठोकत शिंदे गटात रीतसर प्रवेश केला आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. यावेळी नीलम गोऱ्हे यांनी पक्षप्रवेशामागची आपली भूमिका स्पष्ट केली.

“१९९२नंतर एनडीए आणि यूपीए अशा आघाड्या झाल्या. १९९८ साली मी शिवसेनेत प्रवेश केला. मला शिवसेनेत फार चांगलं काम करता आलं. सध्या निवडणूक आयोग व सर्वोच्च न्यायालयाने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पक्षच अधिकृत शिवसेना असल्याचा स्पष्ट निकाल दिला आहे. केंद्र सरकारने अनेक सकारात्मक पावलं उचलली आहेत. नरेंद्र मोदी अमित शाह यांची अनेक मुद्द्यांवर चांगली इच्छाशक्ती दिसत आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या भूमिकांचा सन्मान करून केंद्रातील व राज्यातील सरकार काम करत आहे”, अशा शब्दांत नीलम गोऱ्हेंनी केंद्र सरकार व राज्य सरकारचं कौतुक केलं.

उपसभापतीपदी कायम राहून काम करणार

दरम्यान, यावेळी आपण उपसभापतीपदी कायम राहून काम करत राहणार असल्याचं त्या म्हणाल्या. “मी उपसभापतीपदी असल्यामुळे त्या पदाच्या चौकटीत राहूनच मी काम करणार आहे”, असं त्या म्हणाल्या.

डॉ. नीलम गोऱ्हे यांचा ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुषमा अंधारंमुळे महिला आघाडीत नाराजी?

दरम्यान, सुषमा अंधारेंच्या शिवसेनेतील प्रवेशामुळे महिला आघाडीत नाराजी होती का? यासंदर्भात गेल्या काही महिन्यांपासून जोरदार चर्चा रंगली आहे. यावर नीलम गोऱ्हेंनी खोचक टिप्पणी केली. “आमच्या पक्षात नाराजी वगैरे कुठेच नसतं. नाराजी असली, तरी पक्षाचे नेते आले की सगळे नाराजी विसरत असतात. सटर-फटर लोकांमुळे नाराज होण्याची काही परिस्थिती नाहीये”, असं नीलम गोऱ्हे यावेळी म्हणाल्या.