गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ सुरू आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर अजित पवारांच्या बंडखोरीच्या चर्चेनं महाराष्ट्रातील राजकारण तापलं आहे. अशी एकंदरीत स्थिती असताना शिंदे गटातील आमदार पुन्हा ठाकरे गटात येऊ इच्छित आहेत, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत. त्यामुळे शिंदे गटातील आमदारांना पुन्हा ठाकरे गटात घेणार आहात का? यासाठी कोणते निकष असतील? यावर ठाकरे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे.

शिंदे गटातील आमदारांना पुन्हा ठाकरे गटात घेतलं जाऊ शकतं का? असा प्रश्न विचारला असता नीलम गोऱ्हे म्हणाल्या, “आताची राजकारणातील परिस्थिती पाहिली तर प्रचंड कटुता आणि मतभेद आहेत. कुठल्याही परिस्थितीत एकमेकांना सांभाळून घ्यायचं नाही, हीच भूमिका सगळ्यांची दिसतेय. त्यामुळे भविष्यात काय घडणार आहे? किंवा काय परिस्थिती असेल? याबाबत काहीही सांगता येणार नाही. यापूर्वी राजकारणात अनेकांना अनाकलनीय आणि अविश्वसनीय वाटतील, अशा घडल्या आहेत. त्यामुळे काही गोष्टींची उत्तरं नियती आणि देव देत असतो. त्यामुळे शिंदे गटातील आमदारांना परत घ्यायचं की नाही? याबाबत अंतिम निर्णय उद्धव ठाकरे घेतील.”

“कुणी परत आलं तर त्यांना घ्यायचं किंवा त्यांचं काय करायचं? याबाबत उद्धव ठाकरेंशी कधीही चर्चा झाली नाही,” असंही नीलम गोऱ्हे यांनी स्पष्ट केलं. ‘त्या एबीपी माझा’शी बोलत होत्या.

हेही वाचा- “मविआत एकत्र काम करण्याची इच्छा, पण…”, शरद पवारांच्या वक्तव्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया, म्हणाले…

शिंदे गटातील काही आमदारांनी परत येण्याची इच्छा प्रदर्शित केली तर काय होऊ शकतं? असं विचारलं असता नीलम गोऱ्हे पुढे म्हणाल्या, “कोणती माणसं कोणत्या भूमिकेतून निर्णय घेतात, यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. त्यामुळे ईडी आणि सीबीआयच्या भीतीमुळे जे लोक तिकडे गेले आहेत. त्यांची भीती कधी नष्ट होईल? हा प्रश्न आहे. त्यांची भीती नष्ट होईल, अशी परिस्थिती राष्ट्रीय स्तरावर होईल का? यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. त्यामुळे मला वाटतं की याचं उत्तर मिळायला आपल्याला आणखी काही काळ वाट बघावी लागेल.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“२०१४ ला आमची भाजपाबरोबरची युती तुटली होती. तेव्हा ‘पोपट’ मेला, असं सांगण्यात आलं. पण २०१९ ला पुन्हा युती झाली आणि पुन्हा ती तुटली. हे सगळं पाहिल्यानंतर मला वाटतं की, राजकारणात कायमचं कुणी कुणाचं शत्रू नसतो आणि कायमचं कुणी कुणाचा मित्र नसतो. त्यामुळे राजकारणात आपल्यावर अवलंबून असणाऱ्या लोकांचं हित, आपला आत्मसन्मान कशात आहे? आपल्यासाठी कोणती गोष्ट योग्य आहे? कोणाची मैत्री आपल्याला ओझं आहे? कुणाशी शत्रुत्व असलं तर आपला समन्वय होऊ शकतो? याचा विचार करायला हवा,” अशी प्रतिक्रिया नीलम गोऱ्हे यांनी दिली.