नगर जिल्ह्यात कडुनिंब वृक्षांवर हुमनी भुंगेऱ्यांचा हल्ला; अनेक वृक्ष वठले

निसर्गप्रेमी तथा जैवविविधता संशोधन व संवर्धन समूहाने जिल्ह्यातील या वेगळ्याच समस्येकडे लक्ष वेधले आहे.

कडुनिंबाचा पाला खाणारे हुमनी कीटक.

नगर : शेती, फळबागा व इतर उपयुक्त वनस्पतींसाठी अतिशय उपद्रवी ठरणाऱ्या हुमनी कीटकांनी (भुंगेरे) आता जिल्ह्यातील कडुनिंबांच्या वृक्षांवरही हल्ला चढवला आहे. त्यामुळे जिल्हाभरात ठिकठिकाणीचे कडुनिंबांचे वृक्ष वाळून जात असल्याचे निदर्शनास आले आहे.

निसर्गप्रेमी तथा जैवविविधता संशोधन व संवर्धन समूहाने जिल्ह्यातील या वेगळ्याच समस्येकडे लक्ष वेधले आहे. या समस्येच्या तपासणीसाठी संस्थेने जिल्हाव्यापी सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात हुमनी कीटकांच्या भुंगेऱ्यांचे प्रमाण यावर्षी तुलनेने प्रचंड वाढल्याने त्याचा प्रादुर्भाव मोठय़ा प्रमाणावर कडुनिंब वृक्षांवर दिसून येत असल्याचे आढळले आहे.

निसर्गप्रेमी तथा जैवविविधता संशोधन व संवर्धन समूहाचे प्रमुख, निसर्गअभ्यासक जयराम सातपुते यांनी ही माहिती दिली. त्यांच्याच पुढाकारातून समूहामार्फत जिल्हाव्यापी सर्वेक्षण करण्यात आले.

या सर्वेक्षणात महापालिकेचे उद्यान विभागप्रमुख मेहेर लहारे यांच्यासह उमेश भारती, अतुल सातपुते, राजेंद्र बोकंद, संजय बोकंद, विजय परदेशी, अजिंक्य सुपेकर, विठ्ठल पवार, शशी त्रिभुवन, श्रीराम परंडकर, संदीप राठोड, अंकुश ससे, सतीश गुगळे, नितीन भोगे, मच्छिंद्र रासकर, प्रवीण साळुंके, विलास नांदे, अमित गायकवाड आदी ३० निरीक्षक या सर्वेक्षणात सहभागी झाले होते.

नियंत्रणासाठी रुईच्या चिकाची फवारणी

रासायनिक औषधांपेक्षा या किडीचे नियंत्रण रूईच्या चिकाची फवारणी तसेच बेडूक तसेच कावळे, ससाणा, चिमण्या अशा नैसर्गिक अन्नसाखळ्यांद्वारे प्रादुर्भाव कमी करता येतो. जास्त प्रादुर्भावग्रस्त शेतात हुमणीस कमी बळी पडणारे पिक घेऊन, पिकांची फेरपालट, केल्यास हुमणी नियंत्रणात आणता येईल, अशी माहिती निसर्गप्रेमी तथा जैवविविधता संशोधन व संवर्धन समूहामार्फत देण्यात आली आहे.

महाराष्ट्रात दोन प्रमुख प्रजाती

भारतात हुमनीच्या सुमारे ३०० प्रजाती आहेत. त्यातील ‘लिकोफोलिस’ आणि ‘होलोट्रॅकिया’ या दोन महाराष्ट्रात आढळतात. हुमणीचा जीवनक्रम अंडी, अळी, कोष व कीटक असा आहे. अळीचे मुख्य खाद्य वनस्पतींचे मुळे व साली आहे. अळीअवस्थेत ती शेतीपिकांचे सर्वात जास्त नुकसान करते. पावसाळा सुरू होताच म्हणजे जूनच्या पहिल्या—दुसऱ्या आठवडय़ात भुंगेरे जमिनीतून बाहेर येऊन, थव्यांच्या रूपाने सूर्यास्तादरम्यान कडुनिंब, बाभूळ या झाडांवर रात्री गोळा होतात व त्यांच्या पानांवर उपजीविका करतात. दिवसा जमिनीत राहतात. सुमारे १०० दिवस जगतात. प्रौढ भुंगेरा हा मुख्यत्वे कडुनिंब व बाभूळ वृक्षांची पाने खातो. यावर्षी या हुमणी कीटकांचे प्रमाण जिल्ह्यात अनेक ठिकाणी इतके प्रचंड आहे की संपूर्ण कडुनिंबाची झाडे पूर्णपणे वाळून गेली आहेत.

हुमणीच्या कीटकांचे प्रमाण यावर्षी तुलनेने प्रचंड वाढल्याने त्याचा प्रादुर्भाव मोठय़ा प्रमाणावर कडुनिंब वृक्षांवर दिसून येत आहे. हुमनी हा शेती, फळबागा तसेच इतर वनस्पतींसाठी अतिशय उपद्रवी कीटक असून यांची वाढती संख्या भविष्यासाठी चिंताजनक आहे.

—प्रितम ढगे, वनस्पती अभ्यासक

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Neem trees under attack of white grub insect zws

ताज्या बातम्या