राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटात असलेले आमदार निलेश लंके यांच्याबाबत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला संभ्रम आजही कायम राहिला. निलेश लंके लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी शरद पवार गटात जात असावेत, असे स्पष्ट संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले होते. त्याप्रमाणे निलेश लंके आज पुण्यातील शरद पवार गटाच्या कार्यालयात पोहोचले. मात्र यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत निवडणूक लढविण्याबाबत किंवा शरद पवार गटात प्रवेश करण्याबाबत कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आले नाही. मात्र तुमच्या हातात घड्याळ आहे की तुतारी? असा प्रश्न विचारला असता “साहेब सांगितल तो आदेश”, असे सूचक विधान निलेश लंके यांनी केले.

‘..तर निलेश लंकेंना आमदारकीचा राजीनामा द्यावा लागणार’, अजित पवारांची आक्रमक भूमिका

काय म्हणाले निलेश लंके?

“मी शरद पवारांच्या विचारधारेबरोबरच आहे. लहानपणापासून शरद पवारांच्या नेतृत्वाचा आणि विचारांचा मी चाहता आहे. करोना काळात मी शरद पवार यांच्या नावाने कोविड सेंटर सुरू केले होते. ज्या काळात कुटुबांतील लोक एकमेकांना विचारत नव्हते. त्या काळात मी शरद पवार साहेबांच्या नावाने समाजसेवा करत होतो. त्याच काळात मला जे अनुभव आले. त्याआधारावर ‘मी अनुभवलेला कोविड’ हे पुस्तक लिहिले आहे. त्याचे प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते व्हावे, अशी माझी इच्छा होती. त्यासाठी मी आज इथे आलो आहे”, अशी भूमिका निलेश लंके यांनी मांडली.

विचारधारा एकच आहे, मग पक्षही एकच आहे, असा प्रश्न विचारला असता निलेश लंके म्हणाले की, माझी विचारधारा आणि पक्ष एकच आहे. आजही माझ्या कार्यालयात शरद पवार यांचा फोटो आहे. माझ्या सोशल मीडियाच्या सर्व पोस्ट पाहा. त्यात कुठेही शरद पवारांच्या विरोधात पोस्ट दिसणार नाही. तसेच मी आज शरद पवार साहेबांच्या मंचावर असताना मी दुसऱ्या मंचावर कसा जाईल? असेही निलेश लंके यावेळी म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शरद पवारांकडून लंकेंचं कौतुक

पारनेर तालुक्यातील अतिशय कष्टाळू आणि मेहनती कार्यकर्ता म्हणून निलेश लंके यांचे नाव घेतले जाते. आज ते आमच्या कार्यालयात आले, त्याबद्दल त्यांचे स्वागत करतो. यापुढे कुठेही त्यांना मदत लागली तर त्यांना सहकार्य करू, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.