रत्नागिरी : महायुतीतील सामंत विरुद्ध राणे वाद पुन्हा एकदा समोर आला आहे. रत्नागिरीतील समस्यांवर चर्चा करण्यासाठी बोलवण्यात आलेली सभा पालकमंत्री उदय सामंत यांच्या माणसांनी उधळून लावली. या वादामध्ये आता माजी खासदार निलेश राणे यांनीही उडी घेतली आहे. त्यामुळे महायुतीतील नेत्यांमधील वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. रत्नागिरीतील उधळून लावण्यात आलेल्या सभेविषयी निलेश राणे म्हणाले, गुन्हेगारांना सोबत घेऊन चर्चासत्र उधळायचे, लोकांना बोलूच द्यायचं नाही हा अधिकार तुम्हाला कोणी दिला आहे? लोकांना दडपशाहीने गप्प करण्याची ही पद्धत चालणार नाही. व्यवस्थेवर चर्चा तर होणारच आणि अशा चर्चासत्रात मीसुद्धा उपस्थित राहणार असून शिस्तीत रहा, असा इशारा भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे यांनी दिला आहे. हेही वाचा - “बाहेर राहून बंदूक मारण्यापेक्षा निवडणुकीत…”, महादेव जानकरांची मनोज जरांगेंवर टीका रत्नागिरीतील समस्यांमुळे त्रस्त झालेले रत्नागिरीतील काही नागरिक रविवारी शहरातील एका हॉटेलमध्ये एकत्र येणार होते. मात्र ही सभा होण्यापूर्वीच ती उधळण्यात आली. मुद्दे मंडणाऱ्याना बोलूच न देता त्यांना धमकवण्यात आले. धक्काबुक्की करण्यात आली. या पार्श्वभूमीवर भाजपा नेते निलेश राणे आक्रमक झाले आहेत. या सभेत जो प्रकार झाला तो सर्वसामान्यांचा आवाज दाबण्याचा प्रकार असून रत्नागिरीला बिहार करायचे आहे का असा सवालच त्यांनी उपस्थित केला आहे. सामान्य माणसे रत्नागिरीतील व्यवस्थेबद्दल बोलायला आली होती. त्यांना बोलू दिले नाही, सभेत जे घुसले त्यातले अर्धे गुन्हेगारी पार्श्वभूमीची माणसे होती. म्हणजे अशा लोकांना घेऊन नागरिकांना धमकवण्याचा, त्यांना घाबरवण्याचा अधिकार कोणी दिला ? असा सवाल निलेश राणे यांनी उपस्थित केला आहे. पोलीस यावर कोणती कारवाई करणार? असा सवालही राणे यांनी केला. हेही वाचा - Anil Deshmukh on Eknath Shinde: “एकनाथ शिंदेंआधी पहिला प्रयोग माझ्यावर झाला”, अनिल देशमुखांचा मोठा दावा; म्हणाले, “तो यशस्वी झाला असता तर…” महामार्गाच्या मुद्द्यावर बोलताना राणे म्हणाले, गडकरी साहेबांसोबत बैठक लावा. बाकीचा महामार्ग होतो आणि रत्नागिरीचा भाग का रखडतो याचाही हिशोब झाला पाहिजे. आम्ही उगाच कोणावर टीका करत नाही पण आमच्या नेत्यांवर टीका केली तर ती खपवून घेतली जाणार नाही. शिस्तीत वागा, रत्नागिरीत जर कुणाला विषयावर व्यवस्थेवर चर्चा करायची असेल तर ती झालीच पाहिजे. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, सहकाऱ्यांनीसुद्धा गप्प बसू नका, माझी येण्याची वाट न बघता आपण या मातीचे देणे लागतो हे समजून मैदानात उतरा. लोकांची साथ द्या, लोकांशी चर्चा करायची असेल तर लावा चर्चासत्र, व्यक्तीवर नाही विषयांवर चर्चा करू, मीही त्या चर्चासत्रात येतो. आता सभा उधळतायेत, घोषणा देतायत उद्या घरात घुसायला मागेपुढे पाहणार नाहीत. सामान्य लोकांच्या अंगावर जात आहेत, उद्या तुमच्या अंगावर जातील, कोणावरही हात टाकतील त्याची वाट बघायची का ? मीसुद्धा युतीचा कार्यकर्ता आहे पण सामान्य माणसावर हात टाकला जात असेल तर ते मी सहन करणार नाही, भाजपा कार्यकर्त्यांनी लोकांची बाजू घेऊन मैदानात उतरा, असेही निलेश राणे म्हणाले.