संगमनेर: निळवंडे कालव्यातून शेतकऱ्यांनी उचलण्याचा प्रश्न चिघळण्याच्या मार्गावर आहे. याप्रकरणी सरकारी कामात अडथळा आणला म्हणून थोरात कारखान्याचे संचालक, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे चुलत बंधू इंद्रजीत यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, कालव्यातील पाण्याचा विषय राहुरी किंवा राहत्याला जाणाऱ्या पाण्याच्या बाबतीत नाही. ज्याचा हक्क आहे, त्याला पाणी मिळालेच पाहिजे. यामध्ये पाटबंधारे विभागाचा संवाद कुठेतरी कमी पडतो आहे. म्हणून सर्व शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन चर्चेतून मार्ग निघेल असे मत ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले.

थोरात यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, निळवंडे कालव्यातून शेतकऱ्यांना पाणी देण्यासंदर्भात वादाचा कोणताही विषय नाही. लाभक्षेत्रातील प्रत्येक गावाला हक्काचे पाणी दिले पाहिजे, ही पाटबंधारे विभागाची जबाबदारी आहे. त्याबाबतीत वेळापत्रक तयार करणे, ते योग्यरीत्या पाळले जाईल याचा विश्वास लोकांना देणे, ही भूमिका पाटबंधारे विभागाने घ्यायला हवी. हक्काचे पाणी ज्याचे त्याला मिळाले पाहिजे, याबाबतीत दुमत नाही.

मात्र याबाबतीत कुठेतरी फसवणूक झाल्याची भावना झाल्यामुळे संगमनेर तालुक्यातील जनतेमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे. आपल्याला फसवले जात आहे, ही भावना वाढल्यामुळे शेतकरी पाईप टाकून पाणी घेत आहेत. अशावेळी त्यांच्याशी चर्चा करून हा प्रश्न मिटविला पाहिजे. त्यांना विश्वास दिला पाहिजे की, तुमच्या हक्काचे पाणी तुम्हाला मिळेल. मात्र असे होताना दिसत नाही. याउलट शेतकऱ्यांचे पाईप फोडून त्यांचे नुकसान केले जात असल्याने लोकांच्या भावना तीव्र झालेल्या आहे. संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांचा झालेला संताप जलसंपदा विभागाने समजून घ्यायला हवा. या अगोदर दोन वेळा प्रशासनाने शेतकऱ्यांना शब्द दिला, मात्र त्याचे पालन केले नाही.

निळवंडे धरण आणि कालव्यांची निर्मिती करताना त्याच्यामध्ये लाभ क्षेत्रातील सर्व गावांना पाणी मिळेल याचा विचार करण्यात आलेला आहे. त्यामुळे पाण्यावर लाभ क्षेत्रातील सर्वांचा अधिकार आहे. राहुरी, राहाता तालुक्यातही आपलेच लोक राहतात. या पाण्यावर त्यांचाही हक्क आहे. मात्र पाटबंधारे विभागाच्या भूमिकेमुळे लोकांच्या मनात संशय निर्माण झालेला आहे. यासंदर्भात जलसंपदा विभागाने चर्चा केली असती तर मार्ग निघू शकला असता. कोणतीही चर्चा न करता जलसंपदा विभागाचे कर्मचारी आणि अधिकारी जेव्हा थेट कालव्यांवर जाऊन शेतकऱ्यांनी टाकलेले पाईप उपसून फेकत आहेत किंवा फोडून टाकत आहे, तेव्हा शेतकरी संताप व्यक्त करणे सहाजिक आहे.

इंद्रजीत थोरात यांच्यावर गुन्हा

थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. पाणी उचलण्यासाठी शेतकऱ्यांनी कालव्यात टाकलेले पाईप प्रशासनाने काढले. त्यावेळी उफाळलेल्या संघर्षाचे नेतृत्व शेतकऱ्यांच्या वतीने इंद्रजीत थोरात यांनी केले. कारखान्याने पाईप टाकले आहेत, ते काढू नका. शेतकऱ्यांच्या जमिनी कालव्यासाठी गेल्या, त्यांना आधी पाणी द्या, अशी भूमिका इंद्रजीत यांनी घेतली. जलसंपदा विभागाचे सहाय्यक अभियंता प्रमोद माने यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार अनधिकृत पाईप काढताना थोरात यांनी अटकाव करत सरकारी कामात अडथळा आणल्याची म्हटले आहे.

दरम्यान काल सायंकाळी थोरात, शेतकरी आणि प्रशासन यांच्यात सामोपचाराने याबाबत तोडगा निघाला होता. प्रशासनानेही तो मान्य केला होता. मग आता गुन्हा दाखल करून संगमनेरला पाण्यापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र आहे. कुणाच्यातरी सांगण्यावरून गुन्हे दाखल होत असतील तर आमच्यावरही गुन्हे दाखल करा अशी भूमिका काही शेतकऱ्यांनी घेतली. या एकूणच प्रकरणाने संगमनेर तालुक्यातील वातावरण तणावपूर्ण झाले आहे. शेतकऱ्यांचा उद्रेक आणि आंदोलनाची तयारी यामुळे हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांसाठी लढणे गुन्हा आहे का?

जलसंपदा विभागाने यापूर्वीही शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. संगमनेर तालुक्याचे ४८ किमी लाभक्षेत्र असताना पाण्याबाबत अपेक्षित हमी दिली जात नाही. दिलेला शब्द पाळला जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्यासाठी लढणे गुन्हा आहे का? आम्ही यापुढेही शेतकऱ्यांसाठी लढत राहू. – इंद्रजीत थोरात, संचालक, संगमनेर कारखाना