Nitesh Rane Malhar Certification for Hindu : ‘हलाल’विरोधात ‘झटका’ मांस असा वाद सुरू झाला आहे. मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी केलेल्या एका घोषणेमुळे हा वाद सुरू झाला आहे. ठिकठिकाणी मल्हार प्रमाणपत्रासह मांस विक्री करणारी दुकानं उघडली जातील आणि हिंदूंनी त्याच दुकानांमधून मांस खरेदी करावं असं आवाहन नितेश राणे यांनी केलं आहे. राणे म्हणाले, “आम्ही मटणाच्या दुकानांना मल्हार झटका प्रमाणपत्र देणार आहोत. येथे केवळ झटका मांसाची विक्री होईल. त्यासाठी आम्ही मल्हार सर्टिफिकेशन नावाची व्यवस्था तयार केली आहे. या मल्हार सर्टिफिकेशनच्या संकेतस्थळावर दुकानांची नोंदणी करता येईल. याद्वारे हिंदूंसाठी हिंदूंची मटणाची दुकानं उपलब्ध करून दिली जाणार आहेत. या दुकानांमध्ये १०० टक्के हिंदूंचं प्राबल्य दिसेल. मांस विक्री करणारी व्यक्ती हिंदू असेल.”

दरम्यान, नितेश राणे यांनी हिंदू समुदायाला आवाहन केलं आहे की त्यांनी मल्हार प्रमाणपत्र असलेल्या दुकानातूनच मटण खरेदी करावं. नितेश राणे यांच्या घोषणेनंतर यावर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. माजी खासदार इम्तियाज जलील व आमदार जितेंद्र आव्हाड यांनी यावरून राणे यांना चिमटा काढला आहे.

“तुम्हाला मटण खायचं आहे, तुम्ही खा, आम्हालाही खाऊ द्या”, इम्तियाज जलील यांचा नितेश राणेंना सल्ला

एआयएमआयएमचे नेते व माजी खासदार इम्तियाज जलील म्हणाले, “मला नितेश राणे यांना विचारायचं आहे की तुम्हाला मटण, कबाब, बिर्याणी हे सगळं खायचं आहे. मग तरी देखील मटणाच्या या भानगडीत कशाला पडताय? कशाला मटणाच्या मागे लागलेले आहात? आम्हाला मटण खाऊ द्या आणि तुम्ही देखील खा. तुम्हाला काही प्रमाणपत्र द्यायचंच असेल तर द्या.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

…तर ते मंत्री धन्य आहेत : आव्हाड

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “तुम्ही जय महाराष्ट्र, जय हिंद, जय मल्हार या नावांची मटणाची दुकान मोठ्या प्रमाणात पाहिली आहेत का? मी जय मल्हार नावाची दोन-तीन दुकानं अलिकडेच पाहिली आहेत. परंतु, आपण मटण कोणाकडून घ्यायचं हे जर मंत्री सांगणार असतील तर ते मंत्री धन्य आहेत.