पावसाळ्यात खरे तर मासेमारीच्या क्षेत्रात शांतता असते, पण काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या आठवडय़ात सिंधुदुर्गातील पारंपरिक मच्छीमारांनी साहाय्यक मत्स्य आयुक्त प्रदीप वस्त यांच्या कार्यालयात रुद्रावतार धारण केल्यामुळे कोकणच्या मत्स्य व्यवसायातील वातावरण तापले आहे.
मुंबईसह कोकण विभागातील पाच जिल्ह्य़ामध्ये मिळून सुमारे दोन लाख पारंपरिक मच्छिमार असून पर्ससीन नेट या आधुनिक यांत्रिक नौकांकडून गेल्या काही वर्षांत सर्व कायदे धाब्यावर बसवून बेसुमार मासेमारी केली जात असल्यामुळे आपल्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला असल्याची या पारंपरिक मच्छीमारांची भावना आहे. या संकटाविरोधात महाराष्ट्र- मच्छीमार कृती समिती, तसेच प्रत्येक जिल्ह्य़ातील पारंपरिक मच्छीमारांच्या संघटनांनी सतत आवाज उठवल्यामुळे गेल्या वर्षी फेब्रुवारीत राज्य शासनाने सुधारित महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन कायदा लागू करून या मच्छीमारांचे संरक्षण करण्याचा प्रयत्न केला. पण कागदावरील नियम व अटींची शासनाच्या मत्स्य विभागाकडून काटेकोर अंमलबजावणी सोडाच, उलट पर्ससीननेट नौकाधारकांनाधार्जिणे वर्तन घडत असल्याचे लक्षात आल्यामुळे पारंपरिक मच्छिमार संतप्त झाले. बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्या खासगी वेगवान यांत्रिक नौकांचा पाठलाग करून त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यास आधुनिक साधने आणि मनुष्यबळाची कमतरता, हे त्यामागचे एक महत्त्वाचे कारण आहेच, पण त्याचबरोबर या खात्याच्या जिल्हा पातळीवरील अधिकाऱ्यांची पर्ससीनधारकांबरोबर मिलीभगत असल्याच्या साधार संशयामुळे त्यांच्याविरुद्धअसंतोष धुमसू लागला. त्यामुळे गेल्या आठवडय़ात सिंधुदुर्गचे सहाय्यक मत्स्य आयुक्त वस्त यांना या मुद्यावरून आमदार नितेश राणे यांनी फेकून मारलेला बांगडा, या असंतोषाचाच प्रतीकात्मक आविष्कार होता. पारंपरिक मच्छीमारांना अनुकूल कायदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने केला असला तरी त्याच्या अंमलबजावणीसाठी आक्रमक होत राजकीय लाभ उठवण्यात काँग्रेसचे आमदार नितेश यशस्वी झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे त्यांनी फेकलेला मासा सत्ताधाऱ्यांना जास्त लागणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांची प्रकृती तोळामासाच राहिली आहे. जिल्ह्य़ातील कोणतीही राजकीय लढाई मुख्यत्वे काँग्रेस आणि सेना यांच्यातच असते. पारंपरिक मच्छीमारांच्या मुद्यावरही तेच दिसून आले. भाजपा आणि राष्ट्रवादी या दोन दुबळ्या पक्षांनी या संदर्भात फारशी ठोस भूमिका कधीच घेतली नाही. राणे पिता-पुत्रही मौन बाळगूनच होते. सेनेचा या मच्छीमारांना तत्त्वत: पाठिंबा असला तरी पालकमंत्री केसरकर आणि जिल्हा प्रमुख नाईक यांच्यात संवादाचाच अभाव असल्यामुळे एकत्र येऊन प्रत्यक्ष कृतीद्वारे तो कधी प्रभावीपणे व्यक्त झाला नाही. त्यातच या खात्याचे मंत्री महादेव जानकर काही महिन्यांपूर्वी दौऱ्यावर आले असता पर्ससीननेटधारकांबद्दल त्यांना जास्त ममत्व असल्याचे पारंपरिक मच्छीमार नेत्यांना जाणवले. त्यामुळे अस्वस्थ झालेले भाजपाचे क्रियाशील सदस्य व पारंपरिक मच्छीमारांचे नेते रविकिरण तोरसकर यांच्यासह काहीजणांनी थेट आमदार नितेश यांची भेट घऊन त्यांना या विषयाची गुंतागुंत समजावून लक्ष घालण्याची गळ घातली आणि शिवसेनेला या मुद्यावर मागे रेटण्यासाठी ही चांगली संधी असल्याचे ओळखून नितेश यांनी तोरसकरांसह त्यात उडी घेतली. यावर प्रतिक्रिया देताना आमदार नाईक यांनी, राणे पूर्वीपासून पर्ससीननेटधारकांच्या बाजूने असल्याचा आरोप करत ही नितेश यांची स्टंटबाजी असल्याचीही टीका केली आहे. पण राजकीय पक्षापेक्षाही मच्छीमारांचे हित महत्त्वाचे, अशी भूमिका असलेल्या तोरसकर यांच्यासह कोणावरही त्याचा फारसा परिणाम होण्याची शक्यता नाही. अर्थात नितेश यांची कार्यपद्धत लक्षात घेता या संदर्भात चिकाटीने पाठपुराव्याबाबत शंका आहे. पण राजकीयदृष्टय़ा त्यांनी तूर्त तरी इतरांवर आघाडी घेतली आहे.