Nitesh Rane on Mohan Bhagwat meets Muslims religious leaders : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांनी गुरुवारी (२४ जुलै) दिल्ली येथील एका मशिदीला भेट देत स्थानिक मुस्लीम नेत्यांशी संवाद साधला. भागवत यांनी ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशनचे उमर अहमद इलयासी यांची भेट घेत तासभर चर्चा देखील केली. इलयासी यांच्याबरोबर या बैठकीवेळी इतर मुस्लीम नेते देखील उपस्थित होते. बंद दाराआड पार पडलेल्या या बैठकीनंतर देशभर वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या आहेत.
दरम्यान, शिवसेनेचे (ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी या भेटीवरून राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांना चिमटा काढला आहे. हिंदुत्वाच्या नावाने उड्या मारणाऱ्या नितेश राणे यांनी मोहन भागवतांच्या या मशीद भेटीचा निषेध म्हणून मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, असं राऊत यांनी म्हटलं आहे. पाठोपाठ, या भेटीबाबत आता नितेश राणे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.
नितेश राणे काय म्हणाले?
नितेश राणे म्हणाले, “राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत अशा बैठका घेतात तेव्हा आमची भूमिका स्पष्ट असते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आहे. जी व्यक्ती या देशात राहून या देशाला स्वतःचा देश मानते, ‘भारत माता की जय’, अशी घोषणा देते ती व्यक्ती आमच्यासाठी आमचीच आहे, मग ती व्यक्ती हिंदू असो अथवा मुसलमान.” राणे आयएएनएसशी बोलत होते.
मोहन भागवतांनी मशिदीला दिलेल्या भेटीवर राणे यांची प्रतिक्रिया
मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे म्हणाले, “जो मुसलमान छाती फुगवून भारत माता की जय म्हणतो, त्याला आम्ही स्वीकारतो. मात्र जो व्यक्ती भारतात राहून विभाजनाच्या घोषणा देतो, जिहाद करतो, त्यांचा आम्ही विरोध करतो. जे लोक समाजात लव्ह जिहाद करत आहेत, लँड जिहाद करत आहेत किंवा ‘गजवा ए हिंद’अंतर्गत आमच्या भारताला मुस्लिम राष्ट्र बनवू पाहत आहेत त्या व्यक्तींचा आम्ही निषेध करतो. तसेच आमचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी घेतलेल्या या भेटीतून त्या लोकांना काहीतरी बोध मिळेल असं मला वाटतं.