नारायण राणे यांनी आपला पक्ष भाजपामध्ये विलिन करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु त्यांच्या भाजपा प्रवेशाला अद्यापही मुहूर्त सापडला नाही. त्यातच त्यांचे सुपुत्र नितेश राणे यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामाही दिला. त्यानंतर भाजपामध्ये प्रवेश न करताच त्यांना एबी फॉर्म देणअयात येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. तसंच 4 ऑक्टोबर रोजी ते आपला अर्ज दाखल करतील असंही म्हटलं जात आहे. अशातच ‘काही तास बाकी, वादळापूर्वीची शांतता’ अशा आशयाचं सूचक ट्विट नारायण राणे यांनी केलं आहे.

नितेश राणे हे कणकवलीमधून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याच्या चर्चा आहे. तसंच त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला असून ते भाजपाकडून निवडणूक लढवतील अशाही चर्चा आहेत. अशातच नितेश राणे यांच्या ट्विटने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. सध्या नारायण राणे यांचा भाजपाप्रवेश प्रलंबित आहे.

आपण लवकरच भाजपामध्ये प्रवेश करणार असून पक्षही विलिन करणार असल्याचं नारायण राणे यांनी म्हटलं होतं. परंतु त्यांच्या पक्ष प्रवेशासाठी अद्यापही मुहुर्त सापडत नाहीये. त्यानंतर 2 ऑक्टोबर रोजी ते भाजपामध्ये प्रवेश करतील अशा शक्यता वर्तवण्यात येत होत्या. परंतु याचीदेखील शक्यता मावळली आहे. 2009 मध्ये राणे समर्थक मानले जाणार्या रवी फाटक यांचा भाजपाच्या प्रमोद जठार यांनी केवळ 34 मतांनी पराभव केला होता. तेव्हा पहिल्यांदा राणेंच्या बालेकिल्ल्याला सुरूंग लागला. तर 2014 च्या निवडणुकांमध्ये मालवण कुडाळ मतदारसंघात शिवसेनेच्या वैभव नाईक यांनी नारायण राणे यांचा 10 हजार मतांनी पराभव केला होता. या ठिकाणी राणे यांचा पराभव झाला असला तरी नितेश राणे यांनी भाजपाच्या प्रमोद जठार यांचा 25 हजार मतांनी पराभव करून कणकवली मतदारसंघावर पुन्हा आपलं वर्चस्व निर्माण केलं होतं.

दरम्यान, 4 ऑक्टोबर रोजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याहस्ते एबी फॉर्मचं वाटप करण्यात येणार आहे. त्याचवेळी नितेश राणे यांनादेखील एबी फॉर्म देण्यात येणार असल्याची माहिती भाजपाच्या सूत्रांकडून देण्यात आली. तसंच नारायण राणे यांचा प्रलंबित पक्षप्रवेश आणि त्यांच्या पक्षाचे विलिनीकरण तुर्तास होणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोकणात होणाऱ्या सभांदरम्यान या दोन्ही गोष्टी पार पडणार असल्याचंही सूत्रांकडून सांगण्यात आलं.