जळगाव जिल्ह्य़ातील भुसावळलगत असणाऱ्या ‘महानिर्मिती’च्या दीपनगर येथील वीजनिर्मिती प्रकल्पात राख उत्सर्जनाचा भाग (हॉपर्स) कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोन मजूर जखमी झाले असून या दुर्घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नसल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. या प्रकल्पात ५०० मेगावॉट वीजनिर्मिती संचाच्या राख उत्सर्जन यंत्रणेचा काही भाग शुक्रवारी दुपारी कोसळला होता. त्याखाली राख उचलणारे दोन मजूर गाडले गेल्याची भीती व्यक्त करण्यात आली. मात्र, हे मजूर जखमी झाले असून त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती प्रकल्पाचे मुख्य अभियंता राजेश बावस्कर यांनी दिली. त्यातील एकाचे नांव अविनाथ तायडे असे असून दुसऱ्या मजुराच्या नाव अद्याप समजले नाही.