गेली तीन दशके न चुकता इंदापूर तालुक्यात विणीच्या हंगामासाठी येणाऱ्या चित्रबलाक पक्ष्यांनी सलग दोन वर्षांच्या अवर्षणाने निर्माण झालेल्या पाणीटंचाईमुळे इंदापूर तालुक्याकडे पाठ फिरवली असून, इंदापूर तहसील कार्यालयाच्या आवारातील जुन्या वृक्षांवरील त्यांची जुनी वसाहत व भादलवाडी येथील ब्रिटिशकालीन तलावात मागील दशकात त्यांची संख्या वाढून देशातील सर्वात मोठी वसाहत व चित्रबलकांचे ‘सारंगार’ म्हणून उदयास आलेले ठिकाण या वर्षीच्या दुष्काळाने तिथे पक्षी न आल्याने ओस पडले आहे.
चित्रबलकांच्या विणीच्या हंगामासाठी इंदापुरातील ‘सारंगार’ प्रसिद्ध आहे. मात्र अलीकडील दशकात भादलवाडी येथील या पक्ष्यांची विणीची वसाहत, ज्या वसाहतीला सारंगार म्हटले जाते ती ओस पडल्याने पक्षी निरीक्षक व निसर्गप्रेमींची निराशा झाली असली तरी पर्यावरणाच्या समतोल दृष्टिकोनातून ही धोक्याची घंटा मानली जात आहे.
उजनी धरणाच्या पाणलोटक्षेत्रालगतच्या जलाशयात निर्माण झालेल्या तीव्र पाणीटंचाईमुळे व जे उपलब्ध पाणी आहे ते अत्यंत दूषित असल्याने व पाण्याअभावी माशांची व पाण्यातील जीवजंतूंची उपलब्धता कमी झाल्याने या पक्ष्यांनी इकडे पाठ फिरवली असल्याचे पक्षी निरीक्षकांचे मत आहे.
उजनीच्या विस्तीर्ण जलाशयात मिळणारे मुबलक अन्न, विणीच्या हंगामासाठी सुरक्षित असलेले तहसील कार्यालयाच्या आवारातील ठिकाण व भादलवाडी तलावातील दाट गजबजलेली झाडे, झुडपे या कारणांनी या परिसरात या पक्ष्यांचा विणीच्या हंगामासाठी वावर असला तरी अनेक पक्ष्यांचा अधिवास कायम झाला होता. ही ठिकाणे प्रसिद्धीस आल्यापासून देशातील अनेक पक्षितज्ज्ञांनी या परिसराला भेट देऊन पक्ष्यांची पाहणी केली होती.
उजनी जलाशयात कुंभारगाव, पळसदेव, डाळज परिसरात नियमित येणारे रोहित पक्षी व चित्रबलाक पक्ष्यांच्या वास्तव्यामुळे उजनी धरण पाणलोट परिसरात ‘पक्षी अभयारण्य’ करण्याची योजनाही शासनाच्या विचाराधीन होती. मात्र या पक्षी अभयारण्यास येथील शेतकऱ्यांनी जोरदार विरोध केला. मात्र हे पक्षी येतच राहिले. आज तीन दशके आपल्या वैविध्यपूर्ण हालचालीने, मनमोहक कवायतींनी व रंगांची उधळण करीत पंख पसरवून लक्ष वेधणाऱ्या पक्ष्यांनी इकडे पाठ फिरवली आहे.
रोहित पक्ष्यांच्या अधिवासात वाळू माफियांचा वावर
उजनी जलाशयातील पळसदेव येथील प्राचीन श्री पळसनाथ मंदिराच्या परिसरात रोहित पक्ष्यांचा मोठा अधिवास व वावर असतो. याच परिसरात उजनी जलाशयातून मोठमोठय़ा यांत्रिक बोटींद्वारे प्रचंड वाळुउपसा सुरू होता. हे प्रकरण न्यायालयात गेल्याने सध्या वाळू उपसा बंद असला, तरी मोठय़ा प्रमाणात उजनी जलाशयात पळसदेव येथे प्राचीन मंदिराच्या बाजूला बोटी व वाळू उपसण्याची यंत्रसामग्री आहे. येथून रात्री – अपरात्री चोरटा वाळुउपसा करून वाळू माफिये वाळूची तस्करी करीत असल्याचा ग्रामस्थांना संशय आहे. पक्ष्यांच्या अधिवासात वाळू माफियांचा शिरकाव झाल्याने देशोदेशीच्या सीमा लीलया पार करून उजनीकडे येणाऱ्या रोहित पक्ष्यांचेही पंख वाळू माफियांपुढे टेकणार आहेत.