गणेशोत्सवातील ध्वनिप्रदूषणाचा उन्माद सर्वत्र वाढलेला दिसत असताना सातारा, सांगली, कोल्हापूरसह सोलापूर या चार जिल्हय़ांत मात्र या वर्षीपासून ‘डॉल्बीमुक्ती’ची चळवळ यशस्वीरीत्या रुजत आहे. यात प्रशासनाची इच्छाशक्ती आणि गणेश मंडळांनी दिलेला प्रतिसाद महत्त्वाचा आहे.
सोलापूर, कोल्हापूर, सांगली व साताऱ्यात मिळून सार्वजनिक गणेश मंडळांची संख्या सुमारे ११ हजार आहे. सोलापूर हे तर सार्वजनिक उत्सवांचे आगार म्हटले जाते. येथे वर्षभरात विविध लहानमोठे ४० उत्सव रस्त्यावर साजरे होतात. यात समाजाचे तब्बल १८५ दिवस खर्च होतात. या प्रत्येक उत्सवात डॉल्बीमुळे होणारे ध्वनिप्रदूषण हा मोठय़ा चिंतेचा विषय झाला होता. सोलापूरचे नवे पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनी या डॉल्बीच्या विरोधात कणखर भूमिका घेतली. याचे दृश्य परिणाम यंदाच्या गणेशोत्सवात दिसू लागले आहेत. त्यांनी या डॉल्बीबंदीच्या अंमलबजावणीचे आदेश दिले आहेत. अगदी लग्नाच्या वरातीपासून ते कुठल्याही उत्सवात ‘डॉल्बी’च्या भिंती लावल्यास आयोजकांपासून ते डॉल्बी मालकांपर्यंत सर्वावर गुन्हे दाखल होतात. अगदी लग्नाच्या वरातीत थेट नवरदेवावरही गुन्हे दाखल होऊ लागल्यामुळे सोलापुरात डॉल्बीबाबत अनेकांनी धसका घेतला आहे. यंदाच्या गणेशोत्सवातही याची प्रचीती येत आहे.
सातारा जिल्हय़ातही डॉल्बीमुक्तीला चांगला प्रतिसाद मिळाला. गेल्या वर्षी याच साताऱ्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत ‘डॉल्बी’च्या प्रचंड दणदणाटामुळे एका घराची िभत कोसळून चौघांचा बळी गेला होता. त्या वेळेपासूनच या ‘डॉल्बीमुक्ती’चे अभियान शहरात राबविण्यात येत आहे. या पाश्र्वभूमीवर यंदा गणेशोत्सवात सातारकरांनी शहाणपण दाखवून डॉल्बीला निरोप दिला. सांगलीतही यंदा डॉल्बीचा दणदणाट जाणीवपूर्वक टाळला गेला आहे. यंदा केवळ एका मंडळाने डॉल्बीचा वापर केला असता त्याविरुद्ध गुन्हा नोंद होऊन डॉल्बी यंत्रणा जप्त करण्यात आली.
कोल्हापूर येथे दोन वर्षांपूर्वी गणेश विसर्जन मिरवणुकीत बऱ्याच मंडळांनी डॉल्बीचा उच्छाद मांडला होता. त्या वेळी तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक ज्योतिप्रिया यांनी उन्मादी मंडळांवर कायद्याचा बडगा उगारला होता. त्या वर्षीपासूनच पोलीस आणि प्रशासनाने डॉल्बीबंदीबाबत जनजागृती सुरू केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पश्चिम महाराष्ट्रातील चार जिल्हय़ांत
सध्या ‘डॉल्बीमुक्ती’च्या चळवळीने चांगलाच जोर पकडला आहे. प्रशासनाची खंबीर भूमिका, त्याला नागरिकांचा मिळणारा पाठिंबा आणि मंडळांचे सहकार्य यातून या जिल्हय़ांतून उत्सवातील हा उन्माद लवकरच हद्दपार होईल.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Noise pollution remain under control in west maharashtra during ganesh festival
First published on: 23-09-2015 at 02:47 IST