पंढरपूर : सोलापूर जिल्ह्यातील १२ नगरपालिका निवडणुकीत उमेदवारीअर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सर्वच ठिकाणी गर्दी दिसून आली. जिल्ह्यात महाविकास आघाडीत अनेक ठिकाणी बिघाडी झाली आहे. भाजप काही ठिकाणी स्वबळावर, तर शिंदे, पवार गटासह स्थानिक आघाडीसह निवडणूक लढवीत आहे. जिल्ह्यातील नगराध्यक्षपदी सर्व जागांवर भाजपने उमेदवारी दिली आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी नगराध्यक्ष असो, की उमेदवारीसाठी भाजपतर्फे निवडणूक लढविण्याचे जाहीर केले. त्यामुळे पालकमंत्री गोरे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. अकलूज आणि मोहोळ तालुक्यातील अनगर पालिकेची पहिल्यांदा निवडणूक होत आहे. दरम्यान, मोहोळ तालुक्यातील अनगर येथील १७ म्हणजेच सर्व भाजपचे उमेदवार बिनविरोध झाले आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, पंढरपूर, अक्कलकोट, अकलूज, सांगोला, करमाळा, कुर्डूवाडी, मंगळवेढा, मोहोळ, दुधनी, मैंदर्गी आणि अनगर या नगरपालिकांची निवडणूक होत आहे. यातील अकलूज आणि मोहोळ तालुक्यातील अनगर येथे पहिल्यांदाच नगरपालिकेची निवडणूक होत आहे. निवडणूक जाहीर होताच पालकमंत्र्यांनी सर्व ठिकाणी दौरा करून उमेदवारांच्या मुलाखतीमध्ये पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवायच्या असा आग्रह धरला. विशेष करून नगराध्यक्षपदी भाजपचा उमेदवार दिला, तर महाविकास आघाडीत अनेक ठिकाणी बिघाडी झाली. कॉंग्रेस पक्षाने ८ ठिकाणी स्वबळावर, तर इतर ठिकाणी स्थानिक आघाडीला पाठिंबा दिला. राष्ट्रवादी शरद पवार गटाने खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी अकलूज येथील निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. अकलूजमध्ये भाजपचे माजी आमदार राम सातपुते, खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि राष्ट्रवादी अजित पवार गट अशी तिरंगी लढत होणार आहे.
पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित आहे. इथे भाजप, तीर्थक्षेत्र विकास आघाडी, आमदार अभिजित पाटील यांची विठ्ठल परिवर्तन आघाडी अशी तिरंगी लढत होणार आहे. मंगळवेढ्यात सर्वसाधारण महिला नगराध्यक्षपद राखीव आहे. इथे भाजप, समविचारी आघाडी, तर भाजप बंडखोर अशी लढत होणार आहे. सांगोलामध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग खुला नगराध्यक्ष पदासाठी आरक्षित आहे. या ठिकाणी भाजप, शेकाप राष्ट्रवादी आणि उभाठा यांची युती विरुद्ध शिवसेना शिंदे गट असे निवडणुकीचे चित्र आहे. करमाळा सर्वसाधारण महिला नगराध्यक्ष पदासाठी आहे. या ठिकाणी भाजप, शिवसेना शिंदे, स्थानिक करमाळा विकास आघाडी अशी लढत होणार आहे. कुर्डूवाडीमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला नगराध्यक्ष पद राखीव आहे. या ठिकाणी उबाठा, भाजप आणि शिंदे शिवसेना आणि राष्ट्रवादी शरद पवार एकत्र आली आहे. याशिवाय अक्कलकोट येथे भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची, तर मोहोळ येथे पुन्हा एकदा भाजप आणि उबाठा अशी लढत होणार आहे.
अनगरमध्ये भाजप बिनविरोध
पहिल्यांदाच नगरपालिकेची निवडणूक होत असलेल्या मोहोळ तालुक्यातील अनगर येथील १७ जागी भाजप उमेदवारांचे अर्ज दाखल झाले. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी भाजप सोडून कोणीही अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे येथील १७ जागांवर भाजपचे उमेदवार बिनविरोध झाले असून, औपचारिक घोषणा बाकी आहे. माजी आमदार राजन पाटील यांच्या नेतृत्वात या सर्व जागा बिनविरोध झाल्या आहेत.
