वादळी पाऊस व गारपिटीच्या तडाख्यात सापडल्याने नेहमीच्या तुलनेत यंदा उन्हाळ कांद्याच्या उत्पादनात घट झाली असतानाच चाळीत साठविलेला कांदा देखील खराब होऊ लागल्याने त्याची विक्री करण्याकडे उत्पादकांचा ओढा आहे. स्थानिक बाजारातील या स्थितीमुळे पुढील काळात चांगल्या दर्जाच्या मालाची पोकळी निर्माण होईल, असा या क्षेत्रातील तज्ज्ञांचा अंदाज आहे.
माथाडी कामगार आणि व्यापारी यांच्यातील वादामुळे सलग दोन दिवस बंद राहिलेले जिल्ह्य़ातील लिलाव तात्पुरता तोडगा निघाल्याने बुधवारपासून सुरू होत आहे. लिलाव बंद होण्याआधी सर्वच्या सर्व म्हणजे १५ बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक वाढली होती. गेल्या आठवडय़ात संपूर्ण जिल्ह्य़ात दररोज सरासरी एक लाख क्विंटल कांद्याचे लिलाव सुरु होते. वास्तविक, जून व जुलै महिन्यात उन्हाळ कांदा इतक्या मोठय़ा प्रमाणात विक्रीसाठी आणला जात नाही. परंतु, यंदा तो नेहमीच्या तुलनेत आधीच विक्रीसाठी आणणे उत्पादकांना भाग पडले आहे. जानेवारी महिन्यापासून सुरू असलेली गारपीट, अवकाळी पाऊस यांचा फटका कांदा पिकास बसला. हजारो हेक्टर क्षेत्रावरील पीक उध्वस्त झाले. त्यातून बचावलेला माल सध्या बाजारात येत आहे. उन्हाळ कांद्याचे आर्युमान इतर कांद्याच्या तुलनेत अधिक असते. त्यामुळे त्याची साठवणूक करता येते. एप्रिलपासून सुरू होणारा हा कांदा सप्टेंबपर्यंत बाजाराची गरज भागवितो. काही जणांनी नेहमीप्रमाणे चाळीत साठविलेला कांदा हवामानामुळे खराब होऊ लागला आहे. नैसर्गिक संकटात सापडल्याने आधीच त्याच्या दर्जावर परिणाम झाला आहे. त्यात पुन्हा खराब होण्याचे संकट उभे ठाकल्याने चिंताग्रस्त उत्पादकांनी आहे, त्या स्थितीत तो बाजारात आणण्याकडे कल ठेवला आहे. यामुळे सध्या विक्रीसाठी मोठय़ा प्रमाणात कांदा बाजारात आणला जात असल्याचे लासलगाव बाजार समितीचे सभापती नानासाहेब पाटील यांनी सांगितले.
जून व जुलै महिन्यात स्थानिक पातळीवरील मालाची मोठय़ा प्रमाणात विक्री झाल्यास त्यापुढील दोन महिने चांगल्या दर्जाच्या मालाची टंचाई निर्माण होईल. त्यावेळी मागणी वाढूनही चांगल्या दर्जाचा माल स्थानिक पातळीवरून उपलब्ध होणे अवघड होऊ शकते. मग, साहजिकच ग्राहकांसाठी तो तिखट ठरू शकतो, असे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे.