भ्रमणध्वनी, इंटरनेट सेवेतील नेहमीच्याच विस्कळीतपणामुळे भारत संचार निगमच्या ग्राहकांमध्ये कमालीचा संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकारामुळे ढोकी येथील शेकडो ग्राहकांनी सामूहिक निवेदन दिले. सेवा नीट दिली नाही तर खासगी कंपन्यांकडे जाऊ, असा  इशारा दिला.
भ्रमणध्वनी न लागणे, आवाज अस्पष्ट असणे, संभाषण पूर्ण होण्याआधीच अचानक संपर्क तुटणे, स्वत:चा आवाज स्वत:च्याच कानावर येणे आदी तक्रारी ग्राहकांमधून वारंवार केल्या जातात. हीच गत इंटरनेट सेवेची आहे. इंटरनेट सेवेत व्यत्यय येत असल्याने याचा बँकिंग सेवेवर परिणाम होत आहे. परिणामी अनेक ग्राहकांचे व्यवहार खोळंबतात. एवढेच नव्हे तर अनेकदा बँकांचे व्यवहारच बंद राहण्याची वेळ ‘बीएसएनएल’मुळे येत आहे. उस्मानाबाद तालुक्यातील ढोकी येथील शेकडो ग्राहकांनी लेखी निवेदनाद्वारे बीएसएनएलच्या सेवेबाबत महाव्यवस्थापकांकडे तक्रार केली. मात्र त्याची दखल घेण्यात आली नाही. बीएसएनएलच्या सेवेबाबत सुधारणा करण्याच्या सूचना खासदारांनी द्याव्यात, असे एका पत्रान्वये लातूर आणि उस्मानाबादच्या खासदारांना कळविले होते. मात्र, त्याकडे त्यांनीही दुर्लक्षच केले.
 त्यामुळे संतापलेल्या ग्राहकांनी भ्रमणध्वनी सेवेतील गलथानपणास जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, ग्राहकांना उत्कृष्ट सेवा मिळावी, आणि तक्रार बेदखल केल्यास बीएसएनएलचे प्रशासनच उन्मत्त आहे, असे समजून सर्व ग्राहक खासगी कंपनीच्या सेवेकडे वळतील, असा इशारा लेखी निवेदनाद्वारे दिला आहे. तरी देखील बीएसएनएल ग्राहकांच्या सेवेत अद्याप सुधारणा झालेली नाही.