लढाऊ विमानांची बांधणी होणाऱ्या हिंदुस्तान एरोनॉटीक्स लिमिटेडच्या परिसरातील ओझर विमानतळावर सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी आणि ठेकेदार यांच्या रंगलेल्या मद्यपार्टीच्या बहुचर्चित प्रकरणी अखेर या पार्टीला परवानगी देणारे कार्यकारी अभियंता आर. टी. पाटील यांची बदली करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी विमानतळ बांधकामाचा ठेका घेणारे विलास बिरारी यांना आधीच अटक केली होती. ठेकेदारावर कारवाई झाली, मात्र शासकीय जागेत पार्टीला परवानगी देणारे आणि त्यात सहभागी झालेल्या बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांवर कारवाई झाली नव्हती. या कारणावरून मनसे, शिवसेना व अन्य पक्ष सातत्याने आंदोलन करत आहेत. या पाश्र्वभूमीवर गुरुवारी राज्य शासनाकडून त्यांची उचलबांगडी करण्यात आली.
ठेकेदाराप्रमाणे पार्टीला परवानगी देणारे आणि पार्टीत सहभागी झालेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. या प्रकरणाची चौकशी शासनाने एक सदस्यीय समितीमार्फत केली. समितीच्या अहवालाच्या आधारे सार्वजनिक बाधकाम नाशिक विभागाचे कार्यकारी अभियंता आर. टी. पाटील यांची बदली करण्यात आली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यास दुजोरा दिला. अटक टाळण्यासाठी काही अधिकाऱ्यांनी अटकपूर्व जामिनासाठी आधीच उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
नाशिकला हवाई नकाशावर आणण्यासाठी साकारलेल्या ओझर विमानतळाचा वापर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी पार्टीसाठी केल्याची बाब उघड झाल्यानंतर शासकीय अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली होती. मध्यरात्री उशिरापर्यंत चाललेल्या पार्टीत डिजे,  मद्यपानासह नाचगाण्याचाही कार्यक्रम रंगल्याची तक्रार स्थानिक ग्रामस्थ व भाजपच्या खासदारांनी केली होती. विमानतळावरील टर्मिनल इमारतीच्या बांधणीचे काम बांधकाम विभागाने केले आहे. ही संधी साधत सार्वजनिक बांधकामच्या नाशिक विभागाचे मुख्य अभियंता पी. वाय. देशमुख निवृत्तीनिमित्त विमानतळाच्या कामाचा ठेका घेणारे विलास बिरारी यांनी या पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीसाठी आयोजकांनी उत्पादन शुल्क विभागाकडे १२, ५०० रुपये तर बांधकाम विभागाकडे १० हजार रुपये शुल्क भरले होते. रीतसर परवानगी घेऊन ही पार्टी आयोजित करण्यात आल्याचा दावा बिरारी यांनी केला होता. विमानतळावरील टर्मिनल इमारत संवेदनशील परिसरात आहे. शासकीय जागेवर मद्यपार्टीस विमानतळावरील यंत्रणा, बांधकाम विभाग आणि उत्पादन शुल्क विभागाने परवानगी कशी दिली, असा प्रश्न उपस्थित झाला. यावरुन गहजब झाल्यावर पोलिसांनी पार्टी संयोजक बिरारी यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली होती. नंतर त्यांची जामिनावर सुटकाही झाली.