पानेवाडी येथील भारत पेट्रोलियमच्या प्रकल्पात तीन दिवसांपासून सुरू असलेला इंधन वाहतूकदारांचा संप गुरुवारी मध्यरात्री मागे घेण्यात आला. दरम्यान कंपनी प्रशासन, वाहतूकदार व टँकरचालकांची बैठक चार मे रोजी दुपारी तीन वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात होणार आहे
जिल्हाधिकाऱ्यांनी कंपनी प्रशासन व वाहतूकदार प्रतिनिधी यांची बैठक घेऊन सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर पेट्रोल पंपचालकांनी संपातून बाहेर पडत असल्याचे जाहीर केले. त्यानंतर काही वेळातच कंपनी प्रशासनाबरोबर पुन्हा चर्चा होऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनास प्रतिसाद देत संप मागे घेत असल्याचे वाहतूकदारांच्या इतर प्रतिनिधीनींही सांगितले. दोन दिवसानंतरच्या बैठकीत तोडगा न निघाल्यास पुन्हा संपाचे हत्यार उपसले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. त्यानंतर मध्यरात्रीपासूनच प्रकल्पातून टँकरमधून इंधन भरण्यास सुरुवात झाली. शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात होणाऱ्या कंपनी प्रशासन, वाहतूकदार व टँकरचालकांच्या बैठकीत या विषयावर तोडगा निघण्याची शक्यता आहे.
वाहतूकदारांनी संप मागे घेतल्याने ग्राहकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. संपाचा प्रतिकूल परिणाम नाशिक शहरातील पेट्रोल पंपांवर दिसू लागला होता. त्यामुळे गुरुवारी शहरातील इतर पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. परंतु आता संप मिटल्याने एकदोन दिवसात स्थिती पूर्ववत होईल, असे पंपचालकांचे म्हणणे आहे.