महात्मा गांधींच्या संगमनेर भेटीला शंभर वर्षे पूर्ण

दुसऱ्या दिवशी २२ मे रोजी संगमनेर नगरपालिकेच्या प्रांगणात महात्माजींची सभा झाली.

|| सुनील नवले

संगमनेर : लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर देशातील काँग्रेस पक्षाचे नेतृत्व महात्मा गांधींकडे गेले. टिळकांच्या कामाला पुढे नेण्यासाठी महात्माजींनी टिळक स्वराज्य फंडाची घोषणा केली आणि त्यासाठी देशव्यापी दौरा आखला. या दौऱ्याचा एक भाग म्हणून महात्मा गांधी संगमनेरला आले होते. या घटनेला उद्या (२१ मे ) १०० वर्षे पूर्ण होत आहेत. शंभर  वर्षांनंतर देखील महात्मा गांधी यांच्या विचाराच्या स्मृती संगमनेरकरांनी दिलेल्या मानपत्राच्या रूपाने जतन करून ठेवल्या आहे.

संगमनेरातल्या काकासाहेब पिंगळे, बापूसाहेब पारेगावकर, तुकाराम निऱ्हाळी, गंगाधर दळवी, मुरलीधर जयरामदास मालपाणी, जगन्नाथ दळवी, गणेश सखाराम सराफ, लालसाहेब पीरजादे, शिवनारायण नावंदर, बाबुराव ठाकूर, शंकरराव संतवकील आदी पुढारी मंडळींनी महात्मा गांधींना संगमनेरला येण्याचे निमंत्रण दिले. गांधीजींनी ते स्वीकारले आणि २१ मे १९२१ रोजी महात्मा गांधी नाशिकहून थेट संगमनेरात पोहोचले. संगमनेरच्या भूमीला महात्मा गांधी यांचे पाय लागल्याने संगमनेरकर आनंदित झाले होते. गांधी त्या दिवशी शहरातील श्रीचंद वीरचंद गुजराती यांच्याकडे मुक्कामाला थांबले होते. या वेळी त्यांच्यासोबत महादेवभाई देसाई हे देखील होते.

दुसऱ्या दिवशी २२ मे रोजी संगमनेर नगरपालिकेच्या प्रांगणात महात्माजींची सभा झाली. या सभेत संगमनेरकर नागरिकांच्या वतीने गांधीजींना मानपत्र देण्यात आले. तांब्याच्या पत्र्यावर कोरलेल्या या मानपत्रावर लालसाहेब पीरजादे, गणेश सखाराम सराफ, बाबुराव अण्णाजी ठाकूर, शिवनारायण शाळिग्राम नावंदर व तुकाराम बाळाजी निऱ्हाळी यांची नावे कोरलेली आहेत. हे मानपत्र गांधीजींनी त्यांची आठवण म्हणून पुन्हा नगरपालिकेकडे सुपूर्द केले. महादेव शंकर शिंदे नावाच्या कारागिराने तांब्याच्या पत्र्यावर कोरलेले हे मानपत्र सध्या नगरपालिकेकडे उपलब्ध आहे. या सभेनंतर महात्मा गांधी कोपरगावमार्गे येवला येथे सभेसाठी रवाना झाले. २२ मे रोजी संगमनेरात झालेल्या महात्मा गांधींच्या सभेचा वृत्तान्त ९  जून १९२१ च्या नवजीवन या नियतकालिकात प्रसिद्ध झाला होता. संगमनेरातील मुक्कामाच्या दुसऱ्या दिवशी गांधी यांची नगरपालिकेच्या प्रांगणात सभा झाली. या सभेत त्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून संगमनेरकरांनी टिळक स्वराज्य फंडासाठी देणग्या दिल्या. त्या काळी संगमनेरकरांनी टिळक फंडासाठी दिलेली मदत महत्त्वपूर्ण होती, अशी माहिती संगमनेर इतिहास संशोधन मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. संतोष खेडलेकर यांनी दिली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: One hundred years have passed since mahatma gandhi visit to sangamner akp

Next Story
‘बुद्धिस्ट सर्किट’ विकासातून पर्यटनास चालना
ताज्या बातम्या