२७ लाखांच्या मोबाईल चोरीचा उलगडा; नागपूरमधून माल चोरुन नेपाळला विकण्याचा होता प्लॅन; पण…

महाराष्ट्रामधील नागपूरमध्ये चोरी केलेला माल शेजारच्या देशामध्ये विकण्यासाठी नेला जात असतानाच नागपूर पोलिसांनी केली कारवाई

India Nepal
मोठ्या गॅगबद्दलचा खुलासा करण्यात नागपूर पोलिसांना यश (प्रातिनिधिक फोटो)

नागपूरमधील अंबाझरी पोलिसांनी एका मोठ्या मोबाईल चोरीच्या रॅकेटडा भांडाफोड केलाय. पोलिसांनी मोबाईल चोरी करणाऱ्या एका टोळक्याला अटक केलीय. नेपाळच्या सीमेवर जाऊन नागपूर पोलिसांनी ही कारवाई केलीय. अटक करण्यात आलेल्या टोळीतील सदस्य हे मोबाईल चोरी करुन ते नेपाळ, पाकिस्तान, बांगलादेश, भूतान सारख्या शेजारच्या देशांमध्ये विकायचे.

नागपूरमधील धरमपेठ येथील वन प्लस या चिनी कंपनीच्या मोबाईलचं दुकान फोडण्यात आलं होतं. त्यावेळी या दुकानामधून वन प्लसचे तब्बल २७ लाख रुपये किंमतीचे मोबाईल चोरांनी संपात केले होते. या चोरीनंतर पोलिसांनी तांत्रिक मदत घेत चोरांचा माग करण्यात सुरुवात केली. नंतर पोलिसांना याच तपासाच्या आधारे चोरीला गेलेला माल आणि चोर इंदूरमध्ये असल्याचं समजलं. पण पोलीस या ठिकाणी पोहचेपर्यंत चोर बिहारमधील चंपारण्यामध्ये पोहचलेले. या ठिकाणाहून नेपाळमध्ये वस्तू सहज नेता येत असल्याने चोरांनी हे ठिकाण निवडलं होतं.

दरम्यानच्या काळात एका गुन्ह्यामध्ये बिहार पोलिसांनी या टोळीतील दोघांना अटक केली. त्याचवेळेस नागपूर पोलीस या ठिकाणी पोहचले. बरेच प्रयत्न केल्यानंतर या चोरांची कस्टडी नागपूर पोलिसांना मिळाली. या दोघांची कसून चौकशी केली असता हा सारा उद्योग एका मोठ्या टोळक्याच्या माध्यमातून चालवला जात असल्याचं उघड झालं. देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात मोबाईल चोरी करुन दे नेपाळ, पाकिस्तान, भूतान, बांगलादेशात जाऊन विकण्याचे उद्योग हे टोळकं करायचं.

हे चोर तांत्रिक दृष्ट्या फारच सज्ञान असल्याचंही तपास समोर आलंय. आपण पकडले जाऊ नये म्हणून ही टोळी चोरी करणाऱ्या शहरामधील इंटरनेट नेटवर्क न वापरता डोंगलच्या मदतीने संवाद साधायचे. हे लोक डोंगलवरुन फेसबुकच्या माध्यमातून ग्राहकांशी संपर्क करत असल्याने त्यांना लोकेशनच्या आधारे पकडणं कठीण झालं. टोळीत दोघे हाती लागले असून इतरांचा शोध सुरु असल्याची माहिती अंबाझरीचे पोलीस निरीक्षक अशोक बागुल यांनी दिली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Oneplus store burglary mobile thieves gang nabbed by nagpur police from india nepal border scsg