सोलापूर : कांदा दर प्रश्नावर राज्यात आंदोलन पेटले असताना इकडे कांदा बाजारासाठी प्रसिध्द असलेल्या सोलापूर कृषिउत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा दरात चाललेली घसरण थांबायला तयार नाही, तर कांदा दर आणखी खालावत आहे. गेल्या दोन दिवसांत कांद्याचा सरासरी दर प्रतिक्विंटल सहाशे रूपयांवरून खाली येऊन पाचशे रूपयांवर स्थिरावला आहे.
हेही वाचा >>> पालकमंत्र्यांना शोधा, ५० खोके मिळवा; अमरावतीत युवा सेनेचे आंदोलन
सोलापूर कृषिउत्पन्न बाजार समितीत कांदा आणून विकणेही शेतकऱ्यांना जोखमीचे ठरू लागले आहे. कांदा विक्रीतून हाती रक्कम पडण्याऐवजी उलट हमाली, तोलाई, वाहतूक खर्च कपात केल्यानंतर उलट पदरचे जादा पैसे व्यापाऱ्याला देण्याचा भुर्दंड पडत आहे. यात बोरगावचे राजेंद्र तुकाराम चव्हाण आणि शेजारच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील दाऊतपूरचे बंडू भांगे या शेतकऱ्यांची नावे पुढे आली आहेत. एकीकडे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची अशी क्रूर थट्टा थांबविण्यासाठी राज्यात कांदा दराचा प्रश्न पेटला असताना दुसरीकडे सोलापुरात कांदा दराची घसरण न थांबता सुरूच असल्याचे दिसून येते. गेल्या जानेवारीअखेरपासून कांदा दर गडगडत आहेत. प्रतिक्विंटल सरासरी १५०० रूपये मिळणारा कांदा दर आता पार खाली कोसळून पाचशे रूपये झाला आहे. तीन दिवसांपूर्वी कांद्याचा सरासरी दर सहाशे रूपये होता. दररोज कांदा आवक ४५ हजार ते ५० हजार क्विंटलपर्यंत होत आहे. आवक वाढत असल्यामुळे दराची घसरण न थांबता उलट त्यात आणखी भर पडत आहे.