|| अनिकेत साठे

कांद्याची देशातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लासलगाव बाजारात दरवर्षी नोव्हेंबरमध्ये तब्बल अडीच ते तीन लाख क्विंटल कांदा येतो. अवकाळी पावसाच्या तडाख्याने यंदा हे प्रमाण एक ते सव्वा लाख क्विंटलने कमी होण्याच्या मार्गावर आहे. आतापर्यंत बाजारात केवळ ७५ हजार क्विंटलची आवक झाली. इतर बाजार समित्यांमध्येही आवक घटली आहे. देशांतर्गत बाजारात प्रचंड मागणी असूनही स्थानिक पातळीवर फारशी उपलब्धता नसल्याने कांदा तेजीत आहे. महिना-दीड महिन्यात नवा कांदा मुबलक प्रमाणात येईल, तेव्हाच हे चित्र बदलणार आहे.

अवेळी झालेल्या पावसाने जिल्ह्य़ातील लाखो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. काढणीवर आलेला नवा कांदा पाण्याखाली गेला. ५४ हजार ४०८ हेक्टरवरील कांद्याचे नुकसान झाले. अनेकांकडे लागवडीसाठी पुरेशी रोपे राहिली नाही. यामुळे जिल्ह्य़ातील कांदा उत्पादन मोठय़ा प्रमाणात घटणार असल्याचे कृषी अधिकारी संजीव पडवळ यांनी सांगितले. पावसामुळे खरीप कांद्याची लागवड महिनाभर उशिरा झाली होती. काढणीवर आलेल्या कांद्याचे पावसाने नुकसान केले. आता जो माल हाती येईल, त्याची प्रतवारी खालावलेली असेल. लेट खरीप, उन्हाळी कांद्याची लागवड पुढे गेली. रोपांचे नुकसान झाल्याने लागवडीत अडचणी उद्भवत आहेत. चाळीत साठवलेला उन्हाळ कांदा सप्टेंबर, ऑक्टोबपर्यंत गरज भागवतो. याच सुमारास नव्या लाल कांद्याची आवक सुरू होते. उन्हाळ संपुष्टात येण्याच्या अन् नव्या कांद्याच्या काढणीच्या वेळेत तफावत पडल्यास तुटवडा निर्माण होऊन दर वाढतात, असा अनुभव आहे. पण, अशी स्थिती फार काळ नसते. कुठल्या ना कुठल्या भागातून कांदा बाजारात येऊन गरज भागवली जाते. दरही आटोक्यात येतात. यंदा पावसाने हे चक्र विस्कटले. नव्या कांद्याचे उत्पादन निम्म्याहून अधिकने कमी होण्याचा अंदाज आहे. त्याची प्रचीती बाजार समित्यांमध्ये येत आहे.

लासलगाव बाजार समितीत गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात अडीच लाख क्विंटलची आवक होती. तेव्हा उन्हाळ कांद्याला ६२८ रुपये, तर नव्या लाल कांद्यास १२०० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला होता. तत्पूर्वी म्हणजे नोव्हेंबर २०१७ मध्ये तीन लाख क्विंटलची आवक झाली होती. तेव्हा उन्हाळला साडेतीन तर नव्या कांद्यास तीन हजार रुपयांचा सरासरी दर मिळाला. या वर्षी एक ते १८ नोव्हेंबर या कालावधीत केवळ ७५ हजार क्विंटलची आवक झाली आहे. उन्हाळला पाच हजार, तर लाल कांद्याला चार हजार रुपये भाव मिळाला. आवक घटल्याने महिनाभरात आवक एक ते सव्वा लाखाचा टप्पा गाठू शकेल. म्हणजे, नेहमीची आवक एक ते सव्वा लाख क्विंटलने कमी होणार आहे. इतर बाजारांमध्ये कमी-अधिक प्रमाणात हीच स्थिती आहे. मागणी आणि पुरवठा यामध्ये तफावत पडल्याने कांद्याचे भाव वधारले आहेत. नवा कांदा बाजारात येत असला तरी त्याचे प्रमाण अत्यल्प आहे. दक्षिणेकडील राज्यातही पावसामुळे हीच स्थिती आहे.

अवेळी झालेल्या पावसामुळे काढणीवर आलेल्या खरीप कांद्याचे ५० ते ६० टक्के नुकसान झाले आहे. उत्पादन कमी झाल्यामुळे बाजार समितीतील आवक मोठय़ा प्रमाणात घटलेली आहे. दरवर्षी या काळात नव्या कांद्याची दैनंदिन सुमारे १५ हजार क्विंटल आवक असते. यंदा ती दिवसाला तीन-चार हजार क्विंटलपर्यंत घसरली आहे. महाराष्ट्रासह दक्षिणेकडील राज्यात पावसामुळे घाऊक बाजारात कांद्याची एकसारखी स्थिती आहे. लेट खरीप कांदा जानेवारीपासून सुरू होईल. तेव्हाच भाव कमी होऊ शकतील.  – सुवर्णा जगताप (सभापती, लासलगाव बाजार समिती)