वाशीम जिल्ह्यातील कारंजा दत्त येथील श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज संस्थानने ५ जुलैला गुरु पौर्णिमेच्या मुहूर्तावर श्री गुरु मंदिराच्या अधिकृत संकेतस्थळाचे लोकार्पण केले. या माध्यमातून भक्तांना आता ऑनलाइन दर्शन घेण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.
श्री गुरुमंदिराचे अधिकृत संकेतस्थळ ‘श्रीगुरुमाऊली.कॉम’ हे आजपासून सुरू करण्यात आले आहे. यावर श्री गुरु मंदिराचा संपूर्ण इतिहास, मंदिरात होणारे उत्सव, दैनंदिन कार्यक्रम, दररोजचे पुजाधारकांची नावे, ऑनलाइन देणगी तसेच विविध कार्यक्रमाचे छायाचित्र, चित्रफित आणि भक्तांच्या अभिप्रायाचा समावेश राहणार आहे.
टाळेबंदीमुळे गेल्या तीन महिन्यापासून प्रशासनाच्या निर्देशानुसार श्री गुरुमंदिर भक्तांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे भक्तांची गैरसोय होत आहे. भक्तांची अडचण लक्षात घेता श्री गुरुमहाराजांचे सकाळी १० ते रात्री ९:३० पर्यंत थेट दर्शनाची सुविधा संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे.
या संकेतस्थळाची निर्मिती उमरखेड येथील जी. एस. गावंडे महाविद्यालयातील संगणकशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. नवीन जांभेकर यांनी विनामुल्य केली. या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन संस्थानच्यावतीने करण्यात आले.