पालघर : करोनाच्या प्रादुर्भावामुळे बिकट स्थिती निर्माण झाल्याने मुलांच्या शिक्षणात अडथळे निर्माण झाले आहे. प्रत्येक मुलाने शिकावे यासाठी ऑनलाइन शिक्षण उपक्रम सुरू आहेत. पालघर जिल्हा परिषदेनेही ई- दिशा अॅपची निर्मिती करुन विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाच्या प्रवाहात आणले आहे.
या नवोपक्रमशील, उपक्रमशील शिक्षक सन्मानामुळे इतरांना प्रेरणा मिळेल व पालघर जिल्ह्यचे नाव आणखी उंचावेल. ‘ई-दिशा’ जिल्ह्यसाठी मार्गदर्शक ठरले आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा भारती कामडी यांनी केले आहे. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था व शिक्षण विभाग (प्राथमिक) यांच्या संयुक्त विद्यमाने दिशा अॅपचे लोकार्पण करण्यात आले. उपक्रमशील शिक्षक सन्मान कार्यक्रम जिल्हा परिषदेच्या संकुल सभागृहात हा कार्यक्रम पार पडला.
जिल्ह्यतील डोंगरी, दुर्गम, शहरी भागातील प्रत्येक मुलापर्यंत शिक्षण पोहोचण्यासाठी व शिक्षण विभागातील यंत्रणा सक्षम करण्यासाठी अॅपची निर्मिती केली आहे. प्रातिनिधिक स्वरूपात शिक्षकांचा सन्मान या ठिकाणी होत असून सर्व शिक्षकांनी मनापासून प्रयत्न करून गुणवत्तावाढीसाठी अधिक जोमाने काम करावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धराम सालिमठ यांनी केले.
या वेळी अॅपसाठी उत्कृष्ट योगदान दिल्याबद्दल अतुल पारसर (साहाय्यक गटविकास अधिकारी, जव्हार), तानाजी डावरे (विषय साहाय्यक, पालघर) यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी २६ शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. टाळेबंदीच्या काळात उत्कृष्ट उपक्रम राबवणाऱ्या जिल्ह्य़ातील १८ उपक्रमशील शिक्षकांचाही सत्कार या करण्यात आला. वित्त व बांधकाम समिती सभापती काशिनाथ चौधरी, महिला व बाल विकास अधिकारी प्रवीण भावसार व शिक्षण विभागाचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.