पाच पोलीस ठाण्यांत चार वर्षांत दाखल झालेल्या ५५२ प्रकरणांत केवळ दोन साक्षीदारांची साक्ष पोलीस घेत असल्याचे माहितीच्या अधिकारातून उघडकीस आले असल्याची माहिती बसपाचे चंद्रकांत माझी यांनी पत्रकार परिषदेत दिली. चंद्रकांत माझी यांनी ऑक्टोबर २०११ मध्ये माहितीच्या अधिकारात पोलीस दलाकडे माहिती मागितली होती. मात्र आवश्यक कागदपत्रांचा उल्लेख नसल्याचे कारण पुढे करून ही माहिती त्यांना नाकारण्यात आली. माझी यांनी कागदपत्रांचे सोपस्कार पूर्ण करून पुन्हा डिसेंबर २०११ ला माहिती मागितली, तेव्हा पोलीस ठाणे किंवा पोलीस अधीक्षक कार्यालयात कोणताही कागदोपत्री अभिलेख नसल्याने पोलीस ठाण्याकडून २००० पासूनची यासंदर्भातील माहिती उपलब्ध होऊ शकली नसल्याचे सांगण्यात आले. ही माहिती न्यायालयातून प्राप्त करावी, असा सल्लाही देण्यात आला. मात्र उपलब्ध काही माहिती तेवढी माझी यांना देण्याचे सौजन्य पोलीस विभागाने दाखवले. या माहितीच्या आधारे २००७ पासून २०११ पर्यंत (पुढची आकडेवारी उपलब्ध नाही) भास्कर सहारे व प्रणीत तावाडे हेच दोघे गुन्हय़ांच्या तब्बल ५५२ प्रकरणांत साक्षीदार असल्याची विक्रमी बाब पुढे आली. एवढय़ा गुन्हय़ांमध्ये आणि तेही चंद्रपूर शहर, दुर्गापूर, घुग्घुस, बल्लारपूर अशा विविध पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या प्रकरणात हेच दोन साक्षीदार कसे, असा प्रश्नही उपस्थित होण्यास वाव मिळाला.
चंद्रपूर येथील तत्कालीन अपर पोलीस अधीक्षक तथा प्रथम अपीलीय अधिकारी श्रीराम तोडासे यांनी माझी यांना माहितीच्या अधिकारात दिलेल्या माहितीनुसार, रामनगर पोलीस ठाण्यात २००७ मध्ये १६, २००८ मध्ये २२, २००९ मध्ये ३५ आणि २०११ मध्ये ३६ गुन्हय़ांत पंच म्हणून भास्कर सहारे साक्षीदार आहेत. २००७ मध्ये ३, २००८ मध्ये २९, २००९ मध्ये ६१, २०१० मध्ये ५२ आणि २०११ मध्ये ४७ गुन्हय़ांत प्रणीत तावाडे हे साक्षीदार आहेत. चंद्रपूर शहराची माहिती अप्राप्त आहे. दुर्गापूर येथे २००९ मध्ये भास्कर सहारे एका प्रकरणात, तर २०१० मध्ये दोन प्रकरणांतही तेच साक्षीदार आहेत. प्रणीत तावाडे हे दुर्गापूर अंतर्गत येणाऱ्या २००९ मधील ५९ गुन्हय़ांत, २०१० मध्ये ९७, २०११ मध्ये ५३ गुन्हय़ांत साक्षीदार आहेत. घुग्घुसअंतर्गत येणाऱ्या २०११ मधील दोन गुन्हय़ांत भास्कर सहारे व एका गुन्हय़ात प्रणीत तावाडे साक्षीदार असून बल्लारशा येथील २००७ मधील एका गुन्हय़ात भास्कर सहारे साक्षीदार आहेत. ही माहितीसुद्धा त्रोटक आहे, असे या आकडेवारीवरून दिसते. जिल्हय़ातील रामनगर, चंद्रपूर शहर, दुर्गापूर, घुग्घुस व बल्लारपूर या पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या तब्बल ५५२ गुन्हय़ांच्या प्रकरणात गेल्या चार वर्षांत केवळ दोनच साक्षीदार कायम असल्याची माहिती खुद्द पोलीस विभागानेच माहितीच्या अधिकारात दिली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 12th May 2013 रोजी प्रकाशित
गुन्हय़ांच्या ५५२ प्रकरणांत केवळ दोनच साक्षीदार
पाच पोलीस ठाण्यांत चार वर्षांत दाखल झालेल्या ५५२ प्रकरणांत केवळ दोन साक्षीदारांची साक्ष पोलीस घेत असल्याचे माहितीच्या अधिकारातून उघडकीस आले असल्याची माहिती बसपाचे चंद्रकांत माझी यांनी पत्रकार परिषदेत दिली. चंद्रकांत माझी यांनी ऑक्टोबर २०११ मध्ये माहितीच्या अधिकारात पोलीस दलाकडे माहिती मागितली होती. मात्र आवश्यक कागदपत्रांचा उल्लेख नसल्याचे कारण पुढे करून ही माहिती त्यांना नाकारण्यात आली.
First published on: 12-05-2013 at 02:28 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Only 2 witness in 552 criminal cases