कराड : ‘सह्याद्री’च्या निवडणुकीत माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी आघाडीने विजय मिळवला. त्यात सभासदांना मोफत घरपोच साखर हे आश्वासन महत्त्वाचे ठरले. मात्र, बऱ्याच कालावधीनंतरही आश्वासन पूर्ण झाले नसल्याने विरोधक या मुद्द्यावरून आक्रमक झाले आहेत.

काँग्रेसचे स्थानिक नेते, माजी जिल्हा परिषद सदस्य निवास थोरात यांच्या नेतृत्वाखाली सभासदांच्या शिष्टमंडळाने कारखान्याचे कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील यांना निवेदनाद्वारे सभासदांच्या मोफत साखरेचे काय झाले असा सवाल केला आहे. शिष्टमंडळात भरत चव्हाण, बाबूराव पवार, उमेश मोहिते, संग्राम पवार, अमित जाधव, शिवाजी चव्हाण, सिद्धेश थोरात, दिग्विजय थोरात यांचा समावेश होता.

निवेदनात म्हटले आहे, की वास्तविक सन २०२२-२३ च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांनी पाचऐवजी १० किलो साखर, प्रतिकिलो दोन रुपये दराने किंवा मोफत देण्याची मागणी केली. मात्र, अध्यक्षांनी कारखान्यावरील कर्जाचे कारण देत ती फेटाळली. त्याऐवजी सभासदांना दहा रुपये प्रतिकिलो दराने सात किलो साखर देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे सभासदांच्या डोळ्यात धूळफेक झाली आहे.

सत्ताधारी आघाडीने महिन्याला सात किलो मोफत घरपोच साखर देण्याचे आश्वासन जाहीरनाम्यात दिले. सभासदांनीही ते लक्षात घेऊन मतदानाचा कल ठरवला. मात्र, निवडणूक जिंकल्यानंतर संचालक मंडळाने आश्वासन पाळलेले नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सभासदांना वितरित करण्यात आलेल्या नवीन साखर नोंदपत्रिकेतही गोंधळाची स्थिती आहे. नवीन नियमानुसार पूर्वीपेक्षा प्रति सभासद सुमारे ३४ किलो साखर कमी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, दोन महिन्यांची साखर वजा करून ‘दीपावली कॉलम’अंतर्गत नोंदवण्यात आली असून, तिचे वितरण कधी होणार याबाबत कोणतीही स्पष्टता नसल्याने ही एकप्रकारे साखर देण्याच्या आश्वासनाची फसवणूकच असल्याचा आरोप थोरात यांनी केला. यशवंत विचारांच्या मार्गाने सभासदांच्या न्याय्य हक्कासाठीचा लढा यापुढेही सुरूच राहील, सभासदांच्या हितासाठी आंदोलनात्मक पावले उचलली जातील, असा इशाराही निवास थोरात यांनी दिला.