दिल्ली येथील बलात्कार पीडित तरुणीचे लहान आतडे काढल्यामुळे ती सध्या ‘शॉर्ट गट सिंड्रोम’ या आजाराने त्रस्त आहे. या आजाराच्या रुग्णांसाठी आतडी पुनरेपण शस्त्रक्रिया फायदेशीर ठरू शकते, मात्र त्यासाठी सध्याची वेळ योग्य नाही, असे मत प्रसिद्ध आतडी पुनरेपण शल्यचिकित्सक डॉ. अनिल वैद्य यांनी व्यक्त केले.
दिल्ली येथे गेल्या आठवडय़ात सामूहिक बलात्कार झालेल्या तरुणीची वैद्यकीय स्थिती सध्या गंभीर आहे. तिची आतडी वैद्यकीयतज्ज्ञांनी शस्त्रक्रिया करून काढून टाकली आहेत. आतडी पुनरेपण शस्त्रक्रिया हा तिचा जीव वाचविण्याचा एक उपाय ठरू शकतो असा विचारही समोर आला आहे. या पाश्र्वभूमीवर या प्रकारच्या शस्त्रकियेबाबतचे तज्ज्ञ व युनायटेड किंग्डममध्ये व्यवसाय करणारे डॉ. वैद्य यांनी ‘लोकसत्ता’शी संवाद साधला.
डॉ. वैद्य म्हणाले, ‘या युवतीवर आतडी पुनरेपण शस्त्रक्रिया झाली तर ती भारतातील पहिलीच अशा प्रकारची शस्त्रक्रिया ठरेल. या विषयातील तज्ज्ञही देशात उप लब्ध नाहीत. या युवतीची आतडी शस्त्रक्रियेद्वारे काढून टाकली असून, सध्या तिला नळय़ांद्वारे कृत्रिम पोषण दिले जात आहे. गळा, गळय़ाखालचा भाग आणि मांडीवरील भागात रुंद व्यासाच्या एकूण सहा शिरा असतात. कृत्रिम पोषण देण्यासाठी या शिरा उपयुक्त ठरतात. मात्र अतिवापरामुळे या शिरा कृत्रिम पोषण देण्यायोग्य राहिल्या नाहीत तर पोषण द्यायचे कुठून, असा प्रश्न निर्माण होतो. कृत्रिम पोषण ग्लुकोजवर आधारलेले असते. ग्लुकोज जिवाणूंना आकर्षित करीत असल्याने संसर्गाचा धोका संभवतो. तसेच फार काळ कृत्रिम पोषण देत राहिले असता यकृत निकामी होण्याचा धोका असतो.’
‘लहान आतडे काढल्यामुळे ही युवती ‘शॉर्ट गट सिंड्रोम’ या आजाराने त्रस्त आहे. या आजाराच्या रुग्णांसाठी आतडी पुनरेपण शस्त्रक्रिया फायदेशीर ठरू शकते. मात्र सध्याची वेळ या युवतीवर आतडी पुनरेपण शस्त्रक्रिया करण्यास योग्य नाही. साधारणपणे तीन महिन्यांच्या कालावधीत कृत्रिम पोषणावर राहून तिची वैद्यकीय स्थिती सुधारू शकली तरच ही शस्त्रक्रिया करणे तिच्यासाठी योग्य ठरेल. तरुण असल्यामुळे या शस्त्रक्रियेनंतर तिची स्थिती लवकर सुधारू शकेल आणि पुनरेपण केलेली आतडी स्वीकारण्यास तिचे शरीर योग्य प्रतिसाद देईल. मात्र या शस्त्रक्रियेसाठी रुग्णाची मानसिक तयारी असणेही तितकेच महत्त्वाचे असल्यामुळे घाई न करता तिला मानसिक आणि शारीरिकदृष्टय़ा शस्त्रक्रियेसाठी तयार होऊ देणे महत्त्वाचे आहे,’ असेही डॉ. वैद्य म्हणाले.
संग्रहित लेख, दिनांक 26th Dec 2012 रोजी प्रकाशित
‘बलात्कार पीडित तरुणीवर सध्या तरी आतडी पुनरेपण शस्त्रक्रिया योग्य नाही’
दिल्ली येथील बलात्कार पीडित तरुणीचे लहान आतडे काढल्यामुळे ती सध्या ‘शॉर्ट गट सिंड्रोम’ या आजाराने त्रस्त आहे. या आजाराच्या रुग्णांसाठी आतडी पुनरेपण शस्त्रक्रिया फायदेशीर ठरू शकते,
First published on: 26-12-2012 at 04:44 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Opration on rape victim in this stage is not right