नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटावे, त्यांनी परिसर स्वच्छ ठेवावा, या उद्देशाने जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषद प्रशासनाने पुढाकार घेत शहरात गुरुवारी स्वच्छता मोहीम राबविली. स्वच्छतेचा जागर जिल्ह्यात सर्वत्र केला जाणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे व मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत यांनी सांगितले.
काही दिवसांपूर्वीच डॉ. नारनवरे यांनी नगरपालिका क्षेत्रात भेट देऊन पाहणी केली. त्या वेळी त्यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना शहरातील स्वच्छतेबाबत कार्यवाहीचे निर्देश दिले होते. तुळजापूर येथून डॉ. नारनवरे यांनी या मोहिमेची सुरुवात केली. विविध यंत्रणांचे अधिकारी-कर्मचारी, तसेच शाळा-महाविद्यालयांचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी या सर्वाच्या सहकार्याने ही मोहीम राबविण्यात आली.
जि. प. यंत्रणेने गुरुवारी निर्मल भारत अभियानांतर्गत या मोहिमेचा जागर केला. शिक्षण, आरोग्य यांसह विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी सकाळीच जि.प. यशवंतराव चव्हाण सभागृहात दाखल झाले होते. जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे व मुख्य कार्यकारी अधिकारी रावत यांनी हातात झाडू घेत सर्व सहकाऱ्यांसह परिसर स्वच्छतेला सुरुवात झाली. पदाचा कोणताही अभिनिवेश न बाळगता ही मोहीम राबवली गेली. छत्रपती शिवाजी चौक, ताजमहल टॉकीज, नगर वाचनालय, माऊली चौक, नेहरू चौक, देशपांडे स्टँड आदी भागांत स्वच्छता करण्यात आली. डॉ. नारनवरे यांनी दुकानदारांशीही संवाद साधला. दुकानाजवळ कचरापेटी ठेवा. तेथेच कचरा टाकण्यास सांगा. कोणत्याही परिस्थितीत कचरा इतरत्र पडता कामा नये. तसे झाल्यास दंड भरावा लागेल, अशी तंबीही त्यांनी दिली.
संग्रहित लेख, दिनांक 25th Apr 2014 रोजी प्रकाशित
उस्मानाबादेतही स्वच्छतेचा जागर
नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटावे, या उद्देशाने प्रशासनाने पुढाकार घेत शहरात गुरुवारी स्वच्छता मोहीम राबविली. स्वच्छतेचा जागर जिल्ह्यात सर्वत्र केला जाणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे व मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत यांनी सांगितले.
First published on: 25-04-2014 at 01:55 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Osmanabad cleanness campaign