पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या किंवा भाजपाच्या विरोधात कुठलाही निकाल गेला की उलटसुलट निर्णय घेतले जातात हा इतिहास आहे. दोन हजारांच्या नोटा वितरणातून मागे घेणं हा तसाच निर्णय आहे. या देशाला एक लहरी राजा मिळाला आहे. लहरी राजा असेच निर्णय घेणार आहे हे गृहीत धरुन आपण २०२४ चा काळ ढकलणार आहोत असं म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टोलेबाजी केली आहे.

कर्नाटकमधला भाजपाचा पराभव अत्यंत दारुण आहे. भाजपाला देशाची मानसिकता काय झाली आहे हे दाखवून देणारा निकाल आहे. कर्नाटक हे दक्षिणेतलं महत्त्वाचं राज्य आहे. दक्षिणेत सर्वाधिक प्रखर हिंदुत्व पाहण्यास मिळतं. कर्नाटकमध्ये सर्वात जास्त मंदिरं आहेत. लोक श्रद्धाळू आहेत. कर्नाटकसारख्या राज्यात हिंदूंचे सर्वाधिक सण आणि उत्सव साजरे केले जातात. या हिंदुत्ववादी राज्याने, श्रद्धाळू राज्याने नरेंद्र मोदी, अमित शाह आणि भाजपाचा पराभव केला आहे. हे सत्य भाजपाचे लोक का स्वीकारत नाहीत? असाही प्रश्न संजय राऊत यांनी विचारला आहे. असेच पराभव तुमच्या वाट्याला येणार आहेत.

मुंबई महापालिका, ठाणे महापालिकांसह १४ महापालिकांच्या निवडणुका घेण्याची हिंमत तुम्ही का दाखवत नाही? मोदींना प्रचाराला येऊदेत, अमित शाह यांना प्रचार करु दे आणखी कुणालाही येऊदेत. इथे तंबू ठोकून बसलात तरी आमचं काही म्हणणं नाही. निवडणुका घ्या ही आमची मागणी आहे. त्यानंतर दाखवू की जनमत कुणाच्या बाजूने आहे आणि कुणाला किती जागा मिळतात? असंही आव्हान संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महाराष्ट्रात जागावाटप करत असताना तीन पक्षांमध्ये समन्वय साधावा लागेल. काहीवेळा तडजोड करावी लागेल हे सत्य आहे. शिवसेना आणि भाजपा एकत्र असतानाही आम्ही तडजोडी केल्या आहेत. आत्ताही करु, आम्ही ज्या तडजोडी केल्या त्याचाच फायदा भाजपाने घेतला. आम्ही यावेळी १९ चा आकडा कायम ठेवू असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप ठरलेला नाही असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.