शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना पद्मविभूषण पुरस्‍कार प्रदान करण्‍यात आला आहे. केंद्र सरकारकडून शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला होता. मात्र त्यांना १९ मार्च रोजी झालेल्या कार्यक्रमाला जाता आले नाही. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांच्‍या हस्‍ते बाबासाहेब पुरंदरे यांच्या घरी जाऊन पद्मविभूषण पुरस्‍कार प्रदान करण्‍यात आला.

पद्मविभूषण पुरस्‍कार पद्म विभूषण पदक, मिनिएचर आणि सनद प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी तहसिलदार तृप्‍ती कोलते-पाटील यांच्‍यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बाबासाहेब पुरंदरे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं की, ‘छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवकाळ यांचा शोध घेण्यासाठी सबंध आयुष्य वेचलेल्या एका विद्यार्थ्यांचा हा गौरव आहे. ज्या शिवचरित्रासाठी मी रानोमाळ हिंडलो, दऱ्याखोऱ्या भटकलो, कागदपत्रे गोळा केली, त्याचे अर्थ लावले त्या प्रदीर्घ अभ्यासाचा हा गौरव आहे. शिवचरित्राचा हा गौरव आहे’.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस नेते जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला होता. बाबासाहेब पुरंदरेंना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करुन शिवप्रेमींच्या भळभळून वाहणाऱ्या जखमेवर मीठ चोळले असल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं होतं. पुढे त्यांनी शिवविचारांनी महाराष्ट्र पेटवणार अशी धमकीच दिली होती.