मुख्यमंत्र्यांनी वाढत्या दबावाखाली धनगर समाजाचा आदिवासी प्रवर्गात समाविष्ट करण्याचा निर्णय घेतल्यास मंत्रिमंडळातून राजीनामा देण्याचा इशारा क्रीडा व युवक कल्याणमंत्री पद्माकर वळवी यांनी दिला आहे. आदिवासी गौरव दिनानिमित्त शनिवारी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यंदाच्या आदिवासी दिन सोहळ्यात धनगर समाजाला आदिवासी प्रवर्गात समाविष्ट करण्यास विरोध हाच मुख्य विषय चर्चीला गेला.
नंदुरबारसह उत्तर महाराष्ट्रात विविध ठिकाणी जागतिक आदिवासी दिन मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. नाशिकसह नंदुरबारमधील तळोदा, शहादा, अक्कलकुवा, नवापूर या सर्व शहरांमधून आदिवासी दिनानिमित्त उत्साहात मिरवणूक काढण्यात आली. त्यात पारंपरिक पेहराव आणि वाद्यांच्या तालावर आदिवासी बांधवांनी ठेका धरला. नंदुरबार येथील कार्यक्रमात पालकमंत्री पद्माकर वळवी यांनी थेट मंत्री पदाचा राजीनामा देण्याचा इशारा दिला. मुख्यमंत्र्यांवर धनगर समाजाला आदिवासी प्रवर्गात समाविष्ट करण्यासाठी दबाव वाढत आहे. मात्र, असा काही निर्णय घेतला गेल्यास मंत्रिपदाचा राजीनामा देऊन कायदेशीर लढाई लढली जाईल, असे वळवी यांनी सांगितले.