कोकण विभागात पहिला, तर राज्यात दुसरा जिल्हा

जिओ फेन्सिंग मोबाइल अ‍ॅपचा वापर करून जिल्ह्य़ातील सर्व सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे नमुने गोळा करण्यात पालघर जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. पालघर जिल्ह्यातील १०० टक्के पाणीनमुने गोळा करण्यात आले आहेत.

जिल्ह्यात सार्वजनिक स्रोतांचे रासायनिक तपासणी अभियान १ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत राबविण्याचे राज्य शासनाचे आदेश आहेत. यामध्ये सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे नमुने शासनाने तयार केलेल्या मोबाइल अ‍ॅपद्वारे घेण्यात आले आहेत. पालघर जिल्ह्य़ात १०० टक्के पाणीनमुने गोळा करण्यात आले आहेत. १०० टक्के पाणीनमुने गोळा करण्यात पालघर जिल्हा कोकण विभागात पहिला जिल्हा आहे, तर राज्यात नंदुरबारनंतर दुसरा जिल्हा ठरला आहे.

जिल्हा परिषदेचे पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुषार माळी यांनी याबाबत माहिती दिली. गेल्या तीन अभियानांपासून पालघर जिल्हा या कामात अव्वल असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्ह्य़ातील आठ तालुक्यांतील ४७३ ग्रामपंचायती आणि ८८३ महसुली गावे, पाडे, वाडय़ा, वस्त्या व दुर्गम भागांतून पाणी गुणवत्ता संनियंत्रण आणि सर्वेक्षण कार्यक्रमांतर्गत शासनाने विकसित केलेल्या जिओ फेन्सिंग मोबाइल अ‍ॅपचा वापर करून एकूण ११,८०६ स्रोतांचे पाणीनमुने गोळा करण्यात आले आहेत. मोबाइल अ‍ॅपद्वारे टॅगिंग केलेल्या स्रोतांपैकी पाण्याची उपलब्धता असणाऱ्या ९,६२८ स्रोतांचे नमुने तपासणीसाठी उपविभागीय प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहेत. उर्वरित स्रोत विविध कारणांमुळे बंद, कायमस्वरूपी बंद, वापरात नसलेले, पाण्याअभावी कोरडे आढळून आले आहेत.

नंदुरबार जिल्हा १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यात यशस्वी झालेला आहे. पालघर जिल्ह्याच्या प्रतिकूल भौगोलिक परिस्थिती सागरी, दुर्गम, डोंगरी व नागरी भाग असूनही विहित वेळेपूर्वी जिल्ह्य़ाने हे अभियान पूर्ण केले आहे.