माशांचे प्रजनन योग्य पद्धतीने व्हावे तसेच मच्छिमारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून मासेमारीवर बंदी आणली जात असताना, त्याच काळात तेल सर्वेक्षण केले जात असल्याने तसेच मासेमारी बंदीचा कार्यकाळ शासन कमी करीत असलयाचा निषेध करण्यासाठी अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीच्या पुढाकाराने पालघर जिल्ह्यात अनेक ठिकाणी आज आंदोलन करण्यात आले.

1 जून ते 15 ऑगस्ट किंवा नारळी पौर्णिमा असा पावसाळी मच्छिमारी व्यवसाय बंदीचा सर्वसाधारणपणे 75 दिवसांचा कालावधी कमी करून, राज्य शासनाने 61 दिवसांवर आणला आहे. सध्या राज्यात 1 जून ते 31 जुलै असा मासेमारी बंदीचा कालावधी असताना, केंद्रशासनाने 15 जून पर्यंत खोल समुद्रात मासेमारी करण्याचे आदेश दिल्याने, मासेमारी बंदीचा कालावधी ४७ दिवसांवर येऊन ठेपला आहे. राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या या धोरणामुळे मच्छिमार देशोधडीला लागणार असल्याचा आरोप करत, अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीच्या माध्यमातून जिल्ह्यात अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात आले.

मासेमारी बंदीच्या काळात माशांचे प्रजनन होत असून, त्याच काळात किनाऱ्या जवळच्या प्रजनन होण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या भागात तेल सर्वेक्षण कार्यक्रम यंदा हाती घेण्यात आला आहे. संपूर्ण जून महिन्यात होणाऱ्या सर्वेक्षणामध्ये मत्स्य साठे इतरत्र स्थलांतरित होतील, अशी भीती मच्छिमारांनी व्यक्त केली आहे, शासनाच्या या कृतीचा देखील मच्छिमारांनी या प्रसंगी निषेध नोंदवला.

सातपाटी येथे झालेल्या आंदोलनात संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनोद पाटील, उपाध्यक्ष रवींद्र म्हात्रे, सर्वोदय मच्छीमार सहकारी संस्थेचे अध्यक्ष पंकज पाटील, संजय तरे, पंचायत समिती सदस्य हर्षदा तरे, सरपंच अरविंद पाटील आदी सहभागी झाले होते. त्याचप्रमाणे दांडी, नवापूर, घिवली कांबोडा या भागात देखील मच्छिमारांनी शासनाने दिलेल्या आदेशाच्या विरोधात काळे झेंडे दाखवून निषेध नोंदवला. या आंदोलनात दांडी मच्छीमार संस्थेचे चेअरमन नंदकिशोर तामोरे, भावेश तामोरे तसेच मच्छिमार बांधव सहभागी झाले होते.