|| निखिल मेस्त्री

पालघर ग्रामीण रुग्णालयात तीन तास वीज गायब; प्रशासन मात्र निद्रिस्त:-पालघर ग्रामीण रुग्णालयात गुरुवारी सायंकाळी सहा वाजल्यापासून वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर संपूर्ण रुग्णालय अंधारात गेले आणि त्याचा मोठा फटका रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना बसला. सुमारे तीन तास रुग्णालय अंधारात होते.

अचानक ओढवलेल्या या परिस्थितीनंतर  नेमके काय करावे, हे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना काही कळत नव्हते, पण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारीही गोंधळात पडले होते. अगोदर तीन तास गायब असलेली वीज त्यानंतर काही मिनिटांसाठी आली आणि नंतर खंडित झाली. वीज गेल्याने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना हाल सोसावे लागले. काही रुग्णांच्या नातेवाईकांसाठी हा सारा प्रकार असह्य़ झाल्याने त्यांनी प्रशासनाला शिव्यांची लाखोली वाहिली.

रुग्णालयात वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर पर्यायी साधने उपलब्ध नाहीत. त्यामुळे गुरुवारी संपूर्ण रुग्णालयात अंधार पसरला होता. येथील रुग्णांच्या नातेवाईकांनाच पदरमोड करून मेणबत्त्या विकत आणाव्या लागल्या. तर काहींनी मोबाइलच्या प्रकाशात काही काळ काढावा लागला. रुग्णालयात लहानांपासून मोठय़ा रुग्णांना यामुळे त्रासाला सामोरे जावे लागले.

मनुष्यबळाची कमतरता

रुग्णालयात मनुष्यबळाची कमतरता आहेच, परंतु ऐनवेळी विभागात रुग्ण वाढल्यास त्यांना एकाच खाटेवर उपचारांसाठी झोपवले जाते. तर काही रुग्णांना विभागाच्या बाहेर खाटेवर उपचार सुरू करण्यात येतात. रुग्णालयात गुरुवारी रात्रीच्या सुमारास रुग्णांची संख्या खूप होती. या वेळी रुग्णालयात मोजके कर्मचारी हजर होते. सध्या रुग्ण संख्येच्या तुलनेत कर्मचारी संख्या अपुरी आहे. विजेअभावी रुग्णालयातील अनेक यंत्रणा ठप्प झाल्या होत्या.  दरम्यान रुग्णांसाठी १०८ रुग्णवाहिकाही अनेक वेळेपासून उपलब्ध होत नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांनी आपला संताप व्यक्त केला.