मुंबई-बडोदा महामार्गासाठी भूसंपादन करण्यासाठी पालघर पोलिसांनी आदिवासी महिलांना विवस्त्र होईपर्यंत अमानुषपणे मारहाण केल्याची घटना घडली. ही घटना असंवेदनशीलतेचा कळस असून आदिवासी महिलांविषयी सरकार किती उदासीन हे दिसून येतं आहे असं राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे. काही वेळापूर्वी ट्वीट करत याबाबत गंभीर आरोप केला आहे.
काय म्हटलं आहे सुप्रिया सुळेंनी?
“मुंबई-बडोदा महामार्गासाठी भूसंपादन करण्यासाठी पालघर पोलीसांनी आदिवासी महिलांना अक्षरशः विवस्त्र होईपर्यंत अमानुषपणे मारहाण केल्याची घटना घडली.ही घटना असंवेदनशीलतेचा कळस असून आदिवासी आणि महिलांविषयी हे सरकार किती उदासीन आहे हे दर्शविणारी आहे. माझी राज्य सरकारकडे मागणी आहे की, या प्रकरणाचा उच्चस्तरीय तपास करुन दोषी व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात यावी. दुसरे असे की आदिवासी बांधवांचा विरोध असतानाही त्यांच्या जमीनी पोलीसी बळाचा वापर करून अधिग्रहित का केल्या जात आहेत? त्यांचा जगण्याचा आणि राहण्याचा संवैधानिक हक्क कोणत्याही परिस्थितीत डावलला जाता कामा नये ही आमची भूमिका आहे.” असं ट्वीट सुप्रिया सुळेंनी केलं आहे.
प्रकरण काय?
मुंबई-बडोदा महामार्गासाठी पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी, वसई, पालघर आणि वाडा तालुक्यातील ७१ गावांमधील १०२८ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. त्यापैकी ७५५ हेक्टर जमिनीचा २५२५.४९ कोटींचा मोबदला बाधित शेतकऱ्यांना देण्यात आला आहे. मात्र अनेक ठिकाणी काही निवृत्त अधिकारी दलाली करीत असून महसूल अधिकाऱ्यांना हाताशी धरून मोबदल्यातील निम्मी रक्कम लाटली जात असल्याचा आरोप आहे. एका शेतकऱ्याची जमीन असताना दुसऱ्यालाच पैसे दिले जात असल्याचीही प्रकरणे समोर आली आहेत. या प्रकरणात सरकारने SIT ही स्थापन केली आहे. मात्र सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणात गंभीर आरोप केला आहे.