पंचायत समिती सभापती निवडणूक

जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या सभापती-उपसभापतिपदासाठी आज झालेल्या निवडणुकांमध्ये ९ पैकी ६ ठिकाणी शिवसेनेने, तर तीन ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली.

या पंचायत समित्यांचे सभापती व उपसभापती अनुक्रमे पुढीलप्रमाणे – राजापूर – सुभाष गुरव व अश्विनी शिवणेकर (शिवसेना), लांजा – दीपाली दळवी व युगंधरा हांदे (सेना), रत्नागिरी – मेघना पाष्टे व सुनील नावले (सेना), संगमेश्वर – सारिका जाधव व दिलीप सावंत (सेना), चिपळूण – पूजा निकम (राष्ट्रवादी) व शरद शिगवण (सेना), गुहागर – विभावरी मुळे व पांडुरंग कापले (राष्ट्रवादी), खेड – भाग्यश्री बेलोसे व विजय कदम (सेना), दापोली – चंद्रकांत बैकर व राजेश गुजर (राष्ट्रवादी) आणि मंडणगड – आदेश केणे (सेना) व स्नेहल सपकाळ (राष्ट्रवादी).

यापैकी मंडणगड वगळता उरलेल्या पाच ठिकाणी सेनेचे उमेदवार स्पष्ट बहुमतामुळे विनासायास विजयी झाले, तर मंडणगड पंचायत समितीच्या निवडणुकीत सेना व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांचे समान बळ असल्यामुळे पदाधिकारी निवडीसाठी चिठ्ठय़ा टाकल्या असता सभापतिपदाची माळ सेनेचे आदेश केणे यांच्या गळ्यात पडली, तर चिपळूण पंचायत समितीमध्येही याच दोन पक्षांचे समान सदस्य असल्यामुळे चिठ्ठय़ा टाकल्या असता सभापतिपदी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष शेखर निकम यांच्या पत्नी पूजा निकम यांची निवड घोषित करण्यात आली.

या ९ पंचायत समित्यांपैकी लांजा समितीची दोन्ही पदे महिलांना मिळाली असून निवडून आलेल्या सेनेच्या ७ सदस्यांपैकी ५ चेहरे नवीन आहेत. रत्नागिरी समितीच्या पदाधिकाऱ्यांची पक्षनेत्यांनी केलेली निवड दोन्ही पदाधिकाऱ्यांसह सर्वानाच धक्कादायक ठरली. तालुकाप्रमुख बंडय़ा साळवी यांनी या नावांची आग्रहपूर्वक शिफारस केल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे नेहमीची चर्चेतील नावे बाजूला पडून प्रथमच कुणबी समाजाला मानाचे स्थान मिळाले आहे.

संगमेश्वरात सारिका जाधव यांच्या रूपाने सुमारे २५ वर्षांनंतर प्रथमच कोसुंब गटाला सभापतिपदाचा मान मिळाला आहे. तसेच दापोलीमध्येही या पक्षाचे आमदार संजय कदम यांच्यामुळे सेनेची गेली सुमारे १७ वष्रे असलेली सत्ता संपुष्टात आली.

जिल्ह्यातील विधानसभेच्या ५ जागांपैकी राजापूर, रत्नागिरी आणि चिपळूण  या तीन जागांवर सेनेचे, तर गुहागर व दापोली या दोन ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निवडून आले आहेत. तसेच राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांचे खेड तालुका हे घरचे मैदान आहे. त्याचा लाभ नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद-पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये सेनेला मोठय़ा प्रमाणात मिळाला. त्याचेच प्रतिबिंब या पंचायत समिती पदाधिकारी निवडणुकांमध्येही पडले आहे.