मराठी रंगभूमीला भेडसावणाऱ्या मूलभूत प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी ‘अभिरूप न्यायालय’ करण्याची वल्गना नाटय़ परिषदेने केली खरी; पण मराठी नाटक हा व्यवसाय की हौस, नाटक चांगले की वाईट असे असताना हौशी- व्यावसायिक भेद योग्य आहे का, टीव्हीने नाटकाला मारले की तारले, मराठी नाटकांमध्ये वाद का, अशा चार  जुजबी विषयांचीच चर्चा करीत परिसंवाद रंगला.
माजी संमेलनाध्यक्ष डॉ. मोहन आगाशे या अभिरूप न्यायालयाचे न्यायमूर्ती होते. डॉ. विश्वास मेहेंदळे, विजय केंकरे, आनंद म्हसपेकर, अनंत पळशीकर, मंगेश कदम, चंद्रकांत कुलकर्णी, मुरली खैरनार या रंगकर्मीसह राजा माने, दीपक राजाध्यक्ष, संजय डहाळे, शीतल करदेकर, अमित भंडारी आणि अजय परचुरे यांचा सहभाग असलेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक करंजीकर यांनी केले. नाटक हा हौसेने केलेला व्यवसाय आहे, असे मत चंद्रकांत कुलकर्णी यांनी व्यक्त केले. नाटक हे हौसेचे विस्तारित स्वरूप, म्हणजेच एक्सटेंशन असल्याचे सांगून विजय केंकरे म्हणाले की, या व्यवसायाची गणिते आपल्याला कळत नसल्याने व्यावसायिकता बिलकूल आलेली नाही. नाटक चांगले झाले तर व्यावसायिक आणि सुमार झाले तर हौसेला मोल नाही, असे मानले जात असल्याचे डॉ. विश्वास मेहेंदळे यांनी सांगितले. या विषयावर डॉ. आगाशे यांनी पुलं’चा दाखला दिला. माणूस जगण्यासाठी करतो ती त्याची उपजीविका, जगण्याचे साधन असलेले काम ही जीविका, मात्र ज्यांची जीविका आणि उपजीविका एक त्यांच्यासाठी तो व्यवसाय असल्याचे आगाशे यांनी सांगितले. नाटक चांगले किंवा वाईट हा त्या प्रेक्षकांच्या अनुभवाचा भाग असतो. त्यामुळे नाटक समृद्ध होण्यासाठी हौशी आणि व्यावसायिक असा भेद हा असलाच पाहिजे असे मत चंद्रकांत कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
अ.भा. मराठी नाटय़ संमेलनाचे उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याहस्ते शनिवारी झाले. व्यक्त केले. मावळते संमेलनाध्यक्ष डॉ. मोहन आगाशे, संमेलनाध्यक्ष अरुण काकडे, स्वागताध्यक्ष आमदार भारत भालके, सांस्कृतिक कार्यमंत्री संजय देवतळे, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, नाटय़ परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी, खासदार रामदास आठवले, माजी नाटय़ संमेलनाध्यक्षा लालन सारंग, दत्ता भगत, राम जाधव, सुरेश खरे आदी या वेळी उपस्थित होते.